रत्नागिरी, 22 मार्च, (हिं. स.) : श्री देव भैरी जुगाई, नवलाई, पावणाई, तृणबिंदुकेश्वर संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्थांच्या माध्यमातून आज हिंदू एकतेचे दर्शन घडवत हिंदू नववर्ष स्वागतयात्रा जल्लोषात काढण्यात आली. यामध्ये पारंपरिक वेशभूषेत रत्नागिरीकर हिंदू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात्रेत १०० हून अधिक संस्था, चित्ररथ सहभागी झाले. तसेच १२ हजारांहून अधिक हिंदू बंध-भगिनींनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला.यात्रेत शिवतांडव अथवा अघोर लीलादर्शन, लाठीकाठी, स्वसंरक्षण प्रात्यक्षिके आणि शिवकालीन तलवारबाजीची प्रात्यक्षिके सादर झाली.
ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरात गुढी उभी करून, गाऱ्हाणे घालून स्वागतयात्रेस प्रारंभ झाला. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी श्रीफळ वाढवले. यावेळी उद्योगमंत्री आणि रत्नागिरी-रायगडचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते. शहराच्या विविध मार्गांवरून रथयात्रा येत असताना अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी, स्वागतासाठी रांगोळ्या, पताकांनी वातावरण भारून गेले होते. सकाळी ९ वाजता मारुती मंदिर येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वागतयात्रा सुरू झाली.
मार्गावर सर्वत्र गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. नाक्यानाक्यावर चित्ररथांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यंदा अनेक संस्थांनी प्रथमच स्वागतयात्रेत भाग घेतला होता. सर्वांनी एकमेकांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अनेक चित्ररथांनी विविध संदेश दिले. स्वागतयात्रेमध्ये प्रभू श्रीराम, कृष्ण यांचे देखावे सहभागी झाले होते. भजन पथक, ढोल-ताशे पथक, मच्छीमारीसंदर्भात देखावा, देवरूख ओझरेखुर्द येथील गंगावेस तालीमचे शिवकालीन खेळ लक्ष्यवेधी ठरले. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने प्रथमच भाग घेत उत्तम आरोग्यासाठी सायकल चालवण्याचा संदेश दिला.
ग्रामदैवत भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे, विठ्ठल मंदिर संस्थेचे अध्यक्ष आनंद मराठे, पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेष शिंदे, बाबा परुळेकर, संतोष पावरी, राजन जोशी, अॅड. विलास पाटणे, बाबू म्हाप, राहुल पंडित यांच्यासमवेत हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते. मारुती मंदिर येथे सचिन वहाळकर, कोमल सिंग, कौस्तुभ सावंत, सुहास ठाकुरदेसाई, मुकुंद जोशी, राकेश नलावडे, हर्ष दुडे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
मारुती मंदिर येथून २५ हून अधिक चित्ररथ, संस्था सहभागी झाल्या. श्री मरुधर विष्णू समाज व राजस्थान क्षत्रिय समाजाचा शंभो महादेवाचा रथ सहभागी झाला. त्यामध्ये दिल्लीतील कलापथकाने शिवतांडव, शंभू महादेव, पार्वती आणि यक्ष भूत अघोरी नागा साधू, महाकाली अशी विभिन्न रूपे प्रदर्शित करण्यात आली. आगीवर रॉकेल फुंकणे, स्मशानातील प्रसंग दाखविण्यात आला. अघोरी नागा साधूंनी थरारक शिवतांडव सादर केले आणि सर्वांनी शिवशंभोचा गजर केला.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply