अमरावती, 22 मार्च (हिं.स.) कोणताही उपक्रम सुरू करताना असलेला उत्साह सातत्याने तेवीस वर्षे टिकवून यशस्वी करण्याची परंपरा अमरावती संस्कार भारतीने राखली आहे.भारतीय नववर्षाचे स्वागत आनंददायी आणि अभिनव पद्धतीने आज करताना सृष्टी सृजनाच्या नव वर्षदिनी संस्कार भारतीच्या पाडवा पहाटमध्ये नृत्य,नाट्य,संगीत,साहित्य,रांगोळी अशा विविध विधांच्या सशक्त सादरीकरणातून सुमारे पावणेदोनशे कलावंतांनी अमरावतीकरांची उत्स्फूर्त दाद घेतली.अभिजात भारतीय कला परंपरांचा वेध घेत सादरीकरण करण्याचा संस्कार भारतीचा परिपाठ आहे त्यानुसार यावर्षीच्या पाडवा पहाटमध्ये काही पौराणिक आणि ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेत सर्वांगसुंदर कार्यक्रम सादर झाला.”साधयती संस्कार भारती भारते नवजीवनम ” या ध्येयगिताने प्रारंभ झालेल्या कार्यक्रमात महर्षी वल्मिकिंचा वाल्या कोळी ते महर्षी वाल्मिकी हा नाट्यपूर्ण प्रवास दाखविण्यात आला.आपल्या परंपरेमध्ये स्त्रीच्या पूजनीय स्थानाचे प्रतिपादन करतांना अंबादेवीच्या” आम्ही अंबेचे गोंधळी” या सुंदर गोंधळाचे सादरीकरण करण्यात आले.
महाभारतातील द्रोणाचार्य व एकलव्य प्रसंगातून गुरू शिष्य संबंधांवर भाष्य करणारी लघुनाटीका सादर झाली. भगवदगीतेत सांगितलेल्या कर्मयोगावर अमरावतीचे प्रख्यात कवी व संगीतकार पं मनोहर कवीश्वर यांच्या “विमोह त्यागून कर्मफलांचा” या गीतावर प्रा डॉ मोहन बोडे यांनी अप्रतिम नृत्य प्रस्तुत केले.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कुटुंबाच्या अभूतपूर्व त्याग व बलिदानावर प्रकाश टाकणाऱ्या ” येसू वहिनींच्या ” मनोगताची भावपूर्ण प्रस्तुती रसिका वैष्णव हिने केली.प्रचलित माध्यमं घटनांचा विपर्यास कसा करतात हे एका विनोदी प्रहसनाद्वारे उत्तम प्रकारे दाखविण्यात आले.” वृक्ष वल्ली आम्हा सोयरे” या निसर्ग संवर्धनाचा संदेश देणाऱ्या तुकोबारायांच्या अभंगाद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply