Home Latest Posts संत मुक्ताबाईंचा स्वरूपाकार दिन

संत मुक्ताबाईंचा स्वरूपाकार दिन

संत मुक्ताबाईंचा स्वरूपाकार दिन

मुक्ताबाई १९ मे १२९७ या दिवशी स्वरूपाकार झाल्यानिमित्त…

विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई अशा अलौकिक अध्यात्मिक तेज असलेल्या मुलांचा जन्म झाला. या सर्वांचा जन्म ही ईश्वराची योजना होती.

द्वापारयुगाच्या अखेरीस आणि कलियुगाच्या प्रारंभी श्रीकृष्णाने उद्धवाकडून कवी, हरी, अंतरिक्ष, नारायण, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन या नवनारायणांना द्वारकेत भेटण्यासाठी बोलावून घेतले. कलियुगामध्ये भक्तीचा महिमा वाढवण्यासाठी आणि आपली संस्कृती टिकून राहावी यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची योजना आखली. या योजने अंतर्गत वाल्मिकी ऋषींनी तुलसीदास म्हणून अवतार घेतला. शुकमुनीं कबीर म्हणून जन्माला आले. महर्षी व्यास यांनी जयदेव म्हणून भूतलावर अवतार घेतला. श्रीकृष्ण भक्त उद्धव नामदेव म्हणून भूतलावर वावरले. जांबुवंत नरहरी सोनार म्हणून भूतलावर ओळखले गेले. बलराम पुंडलिकाच्या रूपात प्रगटले. स्वतः श्रीकृष्ण ज्ञानदेव, भगवान शंकर निवृत्तीनाथ, ब्रह्मदेव सोपानदेव आणि साक्षात आदिमाया मुक्ताबाईच्या रुपात जन्माला आली. असे नवनाथ भक्तिसार मधल्या पहिल्या अध्यायातच हे स्पष्ट केले आहे. या चार भावंडांचे अलौकिक कार्य सर्वश्रुत आहे.

ज्ञानेश्वर महाराज, सोपान देव आणि निवृत्तीनाथ या तीनही भावांनी याच क्रमाने समाधि घेतली. या तिघांच्या समाधीचे वैशिष्ट्य असे की या सर्वांच्या समाधीचे मास भिन्न असले तरी या तिन्ही भावांची समाधी तिथी वद्य त्रयोदशी आहे.

ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीला संजीवन समाधी घेतली तो दिवस होता कार्तिक वद्य त्रयोदशी शके म्हणजे २५ नोव्हेंबर १२९६. त्यानंतर सोपान देव यांनी सासवड येथे मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी शके १२१८ म्हणजे २३ डिसेंबर १२९६ या दिवशी समाधी घेतली.

निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी एक पुष्करिणी (तळे) आहे. या पुष्करिणीच्या पश्चिम दिशेला अत्यंत प्राचीन असे एक गुप्त भुयार आहे. ते भुयारच निवृत्तीनाथांच्या समाधीचे स्थान आहे. त्यांनी जेष्ठ वद्य त्रयोदशी शके १२१९ या दिवशी म्हणजे १७ जून १२९७ ला समाधी घेतली.

मुक्ताबाई वैशाख वद्य दशमी शके १२१९ म्हणजे १९ मे १२९७ या दिवशी स्वरूपाकार झाल्या.

मुक्ताबाई स्वरूपाकार होण्याआधी संत नामदेव, संत मुक्ताबाई संत निवृत्तीनाथ आणि अन्य संत हे एक महिना आधी तापी नदीच्या तीरावर गेले. तिथल्या वास्तव्यात एके दिवशी मुक्ताबाई निवृत्तीनाथांना म्हणाल्या, “मला हे सर्व चराचर भगवंत रूप असल्याचे दिसते आहे. सारेच ज्ञानरूप आहे. जन्मापासून मी सर्वत्र वावरत असताना सुद्धा मला कोठेही अज्ञानाचे आवरण दिसले नाही. मी माझे स्वरूप सोडून कधीही या भूतलावर वावरले नाही. ब्रह्मरूपातच या भूतलावर माझा वावर झाला. आपल्या आयुष्यात आपण ज्ञानाचा नंदादीप उजळवला आहे.”

मुक्ताबाईंच्या या बोलण्याचा अर्थ त्या आपल्या मूळ स्वरूपामध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत असाच होता.

मुक्ताबाईंनी समाधी घ्यायची की अर्धोदक करायचे की कुंभक करून प्राणोतक्रमण करायचे की योगाग्नीने देह दग्ध करायचा की शंकराचार्यांप्रमाणे गुहाप्रवेश करायचा की गार्गीप्रमाणे ब्रह्मकुमारी राहून परमार्थात आयुष्य व्यतित करायचे यावर सर्व संतांची चर्चा झाली. अशी चर्चा होण्यामागचे कारण असे की याआधी कोण्या स्त्रीने समाधी घेतल्याचे उदाहरण आढळत नाही. अशी सर्व चर्चा चालली असताना निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईंच्या डोक्यावर आपला हात ठेवून त्यांना चिरंजीव केले.

हे सर्व पाहून काही आकलन न झाल्यामुळे उद्धवाने भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवले आणि या सर्वांचे रहस्य उलगडून सांगण्याची विनंती केली. भगवंता तू तर सर्वांना समाधीचा मार्ग दाखवलास. मात्र मुक्ताबाईंची स्थिती जरा भिन्न आहे. या मागचे कारण केवळ तुलाच ठाऊक आहे. म्हणून सरळ सरळ तुलाच विचारतो की मुक्ताबाईंची नेमकी स्थिती काय आहे?

निवृत्तीनाथांनी आपला अभय कर मुक्ताबाईंच्या शिरावर ठेवला. त्यांना चिरंजीवित्व बहाल केले. आता महाकल्पापर्यंत त्यांचे अस्तित्व टिकून राहणार आहे. मुक्ताबाईंनी जरी देह धारण केलेला असला तरीसुद्धा त्या वृत्तीने निर्गुण, निराकार आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही भुयारात जाऊन समाधी घेण्याची आवश्यकता नाही. तशाच त्या आकाश मार्गाने कुठेही निघून जाणार नाही. समाधी न घेता सुद्धा त्या निर्गुण निराकारात या भूतलावर वावरू शकतात. कारण त्या जन्मापासून कधीही कोणत्याही बंधनात अडकून राहिल्या नव्हत्या. देह धारण केला असला तरी त्यांना देहाचे बंधन नव्हते. म्हणजेच त्या स्वरूपाकार होत्या. हे निवृत्तीनाथांनी जाणले होते. म्हणूनच त्यांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून महाकल्पापर्यंत त्यांना चिरंजीवित्व बहाल केले. अशाप्रकारे मुक्ताबाई स्थूल देहाने गुप्त राहून चिरंजीवित्वाचे वरदान अनुभवत आहेत.

वैशाख वद्य दशमी शके १२१९ या दिवशी त्या स्थूल देहाने गुप्त झाल्या. गुप्त होण्याआधी त्यांनी स्नान केले होते. मुक्ताबाई म्हणजे आदिमाया, आदिशक्ती होय. मुक्त होण्यापूर्वी मुक्ताबाईंनी योग मायेने आभाळ तयार केले. याची पूर्वकल्पना मुक्ताबाईंनी निवृत्तीनाथांना दिली होती. इतर कोणालाही मुक्ताबाई स्वरूपाकार होणार याची कल्पना नव्हती.

म्हणून नामदेव महाराज म्हणाले, “हे असे काय झाले. मुक्ताबाईंनी आम्हाला काहीही सांगितले नाही. ज्ञानेश्वर महाराज आणि सोपान देव यांचा समाधी सोहळा आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला. चांगदेवांचाही समाधी सोहळा आम्ही डोळ्यांनी पाहिला. पण मुक्ताबाईंचे हे निजाधामाला जाणे पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले नाही.”

या मुक्ताबाईंसाठी निवृत्तीनाथांनी समाधी घेतली नव्हती. मुक्ताबाई स्वरूपाकार झाल्यानंतर सुमारे एका महिन्यातच निवृत्तीनाथांनी समाधी घेऊन आपल्या अवतार कार्याला पूर्णविराम दिला. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर सोपानदेवांने सुद्धा एक महिन्यानंतर समाधी घेतली.

एकनाथ महाराज म्हणतात

नाथांचे आश्रमी समाधीरहित।

मुक्तता मुक्त नाम तुम्हा ।।१।।

महाकल्पावरी चिरंजीव शरीर ।

कीर्ती चराचर त्रिभुवनी ।।२।।

आनंदे समाधी सदा ती उघडी ।

नामस्मरण घडोघडी मुखोद्गत ।।३।।

एका जनार्दनी नाम तुमचे गोड ।

त्रिलोकी उघड नाम कीर्ती ।।४।।

भावार्थ – निवृत्तीनाथांच्या आश्रमात मुक्ताबाईंनी समाधीरहित मुक्ती संपादन केली. त्यांना महाकल्पापर्यंत चिरंजीवित्व प्राप्त झाले. त्यामुळे त्यांची कीर्ती चराचर त्रिभुवनात पसरली. इतरांनी समाधी घेताना गुहेत प्रवेश केला आहे. म्हणजेच मोकळ्या जागेवर कोणीही समाधी घेतली नाही. पण मुक्ताबाईंचे वैशिष्ट्य असे की त्यांनी मोकळ्या वातावरणात समाधी घेतली. प्रत्येक क्षणाला त्यांच्या मुखात केवळ भगवंताचे नाम होते. समाधी न घेताच देह रहित अवस्थेत मुक्ताबाई सर्वत्र वावरत आहेत हेच मुक्ताबाईंच्या चिरंजीवित्वाचे वैशिष्ट्य आहे. त्या आजही दर्शन देतात.

मुक्ताबाईंच्या स्वरूपाकाराचे वर्णन करताना संत नामदेव महाराज म्हणतात…

ऋषी म्हणती हरी पातलेसे विघ्न ।

आता कैसे प्राण वाचतील।।१।।

कोणाचिया शुद्धी नाहीचिया कोणा ।

म्हणती नारायण मृत्यू आला ।।२।।

कडाडली वीज निरंजनी जेव्हा।

मुक्ताई जेव्हा गुप्त झाली।।३।।

वैकुंठी लक्ष घंटा वाजती एकघाई ।

झाली मुक्ताबाई स्वरूपाकार ।।४।।

एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी ।

जेव्हा निरंजनी गुप्त झाली ।।५।।

गेले निवारूनी आभाळ आभूट ।

नामा म्हणे कोठे मुक्ताबाई ।।६।।

भावार्थ – मुक्ताबाई जेव्हा स्वरूपाकार होण्यास सिद्ध झाल्या तेव्हा प्रचंड वेगाने वारा वाहू लागला. सगळीकडे धूळ उडाली त्यामुळे कोणालाच डोळे उघडता आले नाहीत. हे वादळ एवढे भयंकर होते की सर्वांना मोठे संकट आल्यासारखे वाटले आणि या संकटातून आता कोणीही वाचणार नाही असेच सर्वांना वाटू लागले. कोणाचीच शुद्ध कोणाला राहिली नाही. सर्वांनाच आता मृत्यूसमिप आल्यासारखे वाटले. तेवढ्यात कडकडाट होऊन वीज चमकल्यासारखे झाले आणि त्याच क्षणी मुक्ताबाई कुठे अदृश्य झाल्या हे कोणालाच कळले नाही. त्या अदृश्य झाल्यावर सुमारे एक प्रहर लख्ख प्रकाश पडला आणि वैकुंठात एक लक्ष घंटा वाजू लागल्या.

अशाप्रकारे मुक्ताबाई स्वरूपाकार झाल्यामुळे आपण त्यांच्या या स्वरूपाकार होण्याला पुण्यतिथी म्हणून संबोधणे योग्य वाटत नाही. वैशाख वद्य दशमी हा दिवस संत मुक्ताबाई यांचा पुण्यतिथी दिन नसून तो स्वरूपाकार दिन आहे असे म्हणणे अधिक उचित होईल. नामदेव महाराजांच्या अभंगातही स्वरूपाकार असाच शब्दप्रयोग त्यांनी योजला आहे.

  • दुर्गेश जयवंत परुळकर

व्याख्याते आणि लेखक

९८३३१०६८१२

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.