मुंबई, 15 मे (हिं.स.) : आर्थिक, शारिरीक, बौद्धिक आदी स्तरावरील विपरित अशा स्थितीतही आपल्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी जगातील अनेक व्यक्ती, खेळाडू, अभ्यासक, विद्यार्थी यांनी परिस्थितीवर मात केली आहे. वास्तविक अशा प्रकारच्या व्यक्तींकडून प्रत्येकाने बोध घ्यायचा असतो, त्याद्वारे आपल्या क्षमतांचा सर्वाधिक वापर करण्याची मानसिकता तयार करीत काम करायचे असते. त्यामुळे व्यक्तिगत आणि राष्ट्राचेही नाव मोठे करण्याचे ध्येय जोपासले जाऊ शकते. याच दृष्टिकोनातून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने रविवारी (१४ मे) सावरकर स्मारकाच्या सभागृहात आंतरजालाच्या सहाय्याने एक आगळावेगळा शो स्मारकांतर्गत असलेल्या विविध उपक्रमांमधील विद्यार्थी, खेळाडू, त्यांचे पालक यांच्यासाठी आयोजित केला होता.
आंतरजालावर उपलब्ध असणारे माहितीपट तसेच त्यातून मिळणारी माहिती स्मारकातील विविध उपक्रमांमधील सदस्यांना देण्याचा यामागे उद्देश आहे. सावरकर स्मारकात तायक्वांडो या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचे प्रशिक्षक राजेश खिलारी यांच्या पुढाकाराने हा शो प्रथमच आयोजित करण्यात आला होता. यापुढेही अशा प्रकारचा उपक्रम स्मारकाच्या विविध उपक्रमातील सदस्यांसाठी, खेळाडू, विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्याचा मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले.
दादर, शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये तायक्वांडो, कराटे, मुष्टियुद्ध, तिरंदाजी, तलवारबाजी, व्यायामशाळा, विविध प्रकारचे नृत्यप्रकार, गायन, एअर रायफल शूटिंग, संस्कृतवर्ग, मोडी प्रशिक्षण, व्यंगचित्रकला आदी विविध उपक्रम राबवले जातात. नवीन पिढीने या क्षेत्रांत आपले कौशल्य, मेहनत पणाला लावून उज्वल कारकिर्द घडवावी यासाठी अशा प्रकारचे विविध उपक्रम सावरकर स्मारकात चालू आहेत. या उपक्रमांमधील विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी सदस्यांसाठीही अशा प्रकारच्या शोद्वारे प्रोत्साहन मिळू शकेल, असा विश्वास सावरकर स्मारकाला वाटतो, असे मत सावरकर स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी व्यक्त केले. या शो ला उपक्रमांमधील संलग्न सदस्यांची, विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती लाभली. अजूनही ती वाढावी, अशी अपेक्षाही यावेळी खिलारीसरांनी व्यक्त केली.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply