नागपूर, 19 मार्च (हिं.स.) : गेल्या 51 महिन्यात 24 किमीचे मेट्रो नेटवर्क, इंटिग्रेटेड वापरासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पातील पहिली सौर पीव्ही प्रणाली आणि शहरी भागातील रेल्वे ट्रॅकवर सर्वात जास्त वजनाच्या सिंगल स्पॅन डबल डेकर स्टील ब्रिज स्थापनेची नोंद घेत आशिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने आज महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
नागपुरातील मेट्रो भवनात आयोजित समारंभात महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, संचालक सुनील माथूर, अनिल कोकाटे आशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या प्रतिनिधी डॉ. सुनीता धोटे, डॉ. चित्रा जैन यावेळी उपस्थित होते. महा मेट्रोने 51 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत 24 किमी लांब मेट्रो रेल कॉरिडॉरचे बांधकाम पूर्ण केले. अशा प्रकारे दर दोन महिन्यांत सुमारे एक किमी लांबीच्या ट्रॅकचे बांधकाम नागपूर मेट्रोने केले. मेट्रो प्रकल्पाच्या एकूण 40 किमी लांबी पैकी 24 किमीचे काम 51 महिन्यांत पूर्ण झाले आहे. एकावनव्या महिन्यात या मार्गिकेवर प्रवासी वाहतूक सुरु झाली. या अंतर्गत 13.50 किमी लांबीच्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉर मधील सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत आणि 10.60 किमी लांबीचा पूर्व-पश्चिम कॉरिडॉर मधील लोकमान्य नगर मेट्रो ते सीताबर्डी इंटरचेंजचा समावेश आहे.
मेट्रो रेल प्रणाली अंतर्गत ऑपरेशन आणि देखभालिवर होणाऱ्या खर्चापैकी एकूण 40टक्केपेक्षा जास्त खर्च उर्जेवर होतो. उर्जेवर होणारा खर्च कमी करण्यासाठी, अक्षय ऊर्जा निर्मिती उपायांचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक मेट्रो रेल प्रकल्पांतर्गत होणाऱ्या बांधकामाच्या निमित्ताने छतावर मोठ्या प्रमाणात जागा तयार होते. मेट्रो रेल प्रकल्पाच्या सुरुवातीपासून, सौर ऊर्जा प्रणालीच्या स्थापनाद्वारे सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी या संसाधनाच्या वापरासाठी होत आहे. या अंतर्गत 31 मार्च 2022 पर्यंत सोलर पीव्ही सिस्टीमने नागपूर मेट्रो मध्ये 38 लाख युनिट पेक्षा अधिक अक्षय ऊर्जा निर्माण केली आहे. यामुळे दर वर्षी सुमारे 2635 टन कोळसा आणि 129 लाख लिटर पाण्याची बचत होईल. या मुळे 5.5 कोटी रुपयांची बचत झाली आहे.
गड्डीगोदाम येथील स्टील ब्रिज ट्रस, डिझाइन, वाहतूक आणि अत्याधुनिक फॅब्रिकेशन आणि लॉन्चिंग तंत्राचा अवलंब करण्याच्या संबंधातील भारतातील याप्रकारचे एकमेव रचना आहे. हा 1680 टन स्टीलचा पूल सर्वोच्च गुणवत्तेच्या पोलादापासून बनलेला आहे. येथील भौगोलिक परिस्थिती अश्या प्रकारच्या कामाकरता अतिशय कठीण असतानाही, यशस्वीपणे येथे उभारणी केली आहे. हे पूल चार-स्तरीय वाहतूक प्रणालीचा भाग असून यात पहिल्या दोन मजल्यावर विद्यमान रस्ता आणि रेल्वेचा पूल असून उर्वरित दोन मजल्यांवर उड्डाण पूल आणि मेट्रो मार्गिका आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply