छत्रपती संभाजीनगर, 14 मे (हिं.स.) कित्येक दशके प्रलंबित पडलेले औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर यंदा झाले. शहरवासीयांमध्ये यामुळे मोठा उत्साह व आनंद संचारलेला आहे. याचा प्रत्यय रविवारी दि.14 मे रोजी छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्ताने आला. रविवार शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त मिरवणुका, रॅली, शोभायात्रा काढण्यात आल्या. यात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी देखील सहभागी झाले.
यानिमित्त बुलंद छावा मराठा युवा परिषद प्रणित छत्रपती संभाजीराजे जयंती समितीतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बुलंद छावा विभागीय कार्यालय ते टी.व्ही. सेंटर चौकापर्यंत रविवारी सकाळी 10 वाजता शोभायात्रा काढण्यात आली. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड (केंद्रीय अर्थ राज्य मंत्री), प्रमुख पाहुणे म्हणून आ. हरिभाऊ बागडे, आ. डॉ. अंबादास दानवे (विरोधी पक्षनेता, विधान परिषद) आदींची उपस्थिती होती. यानंतर शोभायात्रेची सुरूवात होऊन परिसरातील नागरिकांची प्रचंड उपस्थितीत व उत्साहाच्या वातावरणात, वाद्य-वृंदांच्या संगीताच्या तालावर सर्वांनी सहभाग घेतला. महिलांनी पारंपारिक फुगडी, पाऊलीचे सादरीकरण करून त्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. छत्रपती संभाजीराजांच्या जयघोषाने आसमंत दणाणून सोडला. यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे चरण दर्शन व प्रसाद वाटप सकाळी 11 पासून करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply