नाशिक, 15 मे (हिं.स.) : छत्रपती संभाजी महाराज यांनी संपूर्ण आयुष्यभर अतुलनीय शौर्य गाजवत मराठ्यांचे हिंदवी राज्य जिंकन्याचं औरंगजेबाचं स्वप्न अखेरपर्यंत पूर्ण होऊ दिले नाही, असे गौरवोद्गार शिवचरित्रकार शिवरत्न शेटे यांनी केले.
स्व. पंडितराव खैरे स्मृती व्याख्यान पुष्प गुंफण्यात आले. यावेळी व्यासपीठावर व्याख्यानाचे प्रायोजक योगेश खैरे, नगरसेवक शाहू खैरे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घाडगे उपस्थित होते. सोलापूर येथील शिवचरित्रकार शिवरत्न शेटे यांनी शिवशंभू : पितापुत्रांचे अविस्मरणीय भावबंध या विषयावर आजचे पुष्प गुंफले.नवरचना मराठी माध्यम, नाशिक या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तू बुद्धी दे, तू तेज दे या गीतावर नृत्याविष्कार सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत बेणी यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार राजेंद्र शेळके, दत्तात्रय कोठावदे, उषा तांबे, संगिता बाफणा भूषण काळे आदींनी केला.
यावेळी बोलताना शिवचरित्रकार शिवरत्न शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या पितापुत्राचे अविस्मरणीय भावबंध सांगताना शंभू बाळाच्या जन्मापासून सुरुवात केली. शंभुबाळा वर नियतीने माता सईबाईच्या दुधाला पारखं करून अन्याय केला. नियतीने निसर्गदत्त अधिकारही हिरावला. तदनंतर अफजलखान हाहाकार माजवत असताना महाराज सईबाईंना मरणासन्न अवस्थेत सोडून प्रतापगडाकडे रवाना झाले. सव्वादोन वर्षांचे शंभुबाळाची अवस्था काय झाली असेल देव जाणो.
आपल्या भाषणात शेटे यांनी आपण हिंदुस्तानात जन्मलो होळी भाग्याची गोष्ट आणि साता जन्माची पुण्याई असल्यामुळे आपण शिवरायांच्या, संभाजीराजांच्या आणि संतांच्या महाराष्ट्रात जन्मलो असे सांगितले. बखरीत लिहिलेला संभाजी महाराजांचा चुकीचा इतिहास न्या. महादेव गोविंद रानडे यांनी सर्वप्रथम खोडून काढला तो सन 1900 मध्ये प्रकाशित झालेल्या राईज ऑफ मराठा पॉवर या कादंबरीतुन. मराठा हा जातीवाचक शब्द नसून तो समूहवाचकच होता असे न्या. रानडे यांनी लिहिले.
मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत झालेल्या तहात वयाच्या 9व्या वर्षी शंभूराजे जामीन म्हणून तारण म्हणून दिलेरखानाच्या छावणीत ठेवण्यात आले. याच तहानुसार आग्रा येथे औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजांच्या सोबत शंभुबाळ पोहोचले. दरबारात होत असलेला अपमान सहन न झाल्याने शिवाजी महाराज गर्जून बोलले, एकवेळ मी मौत पत्करीन पण अपमान सहन करणार नाही. ही शिवगर्जना पाहूनच शंभूबाळाने कधीच कोणासमोर मान झुकवली नाही. काय असेल पित्याचा आवेश, किती किती अभिमान!
आग्रा येथून शिवाजी महाराजांनी सुटका करून घेतल्यानंतर शिवाजी महाराज बैराग्याच्या वेशात शंभुराजांना मथुरेला पिंगळे यांच्याकडे सोडून जात असताना काय अवस्था झाली असेल पितापुत्रांची. गडावर पोहोचले असता मासाहेबांनी विचारले शंभुबाळ कुठे आहेत? महाराजांनी सांगितले की दगदगीत शंभुबाळ आपल्याला सोडून गेले. लेकरू जिवंत असताना बापाने पिंड घातले काय यातना झाल्या असतील ?
छत्रपती संभाजी यांची बदनामी हेतुपुरस्सर चित्रपट, नाटक आदी माध्यमातून करण्यात आली परंतु इतिहासाच्या सुयोग्य अभ्यासातून या त्यांची बदनामी करणाऱ्या गोष्टी चुकीच्या असल्याचे सिद्ध झाल्याचे शेटे यांनी सोदाहरण स्पष्ट केले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply