मुंबई, 8 जून (हिं.स.) : जनतेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून अधिक व्यापक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. अशाच पद्धतीने गुणवत्तापूर्ण कामाला सर्वांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम, अन्न, नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
सार्वजनिक बांधकाम भवन येथे आयोजित बांधकाम विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांच्या गौरव सोहळयात मंत्री श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर, सचिव (रस्ते) स.शं. साळुंखे, सचिव (बांधकाम) सं. द. दशपुते, सा.बां. प्रादेशिक विभाग, मुंबईचे मुख्य अभियंता र. रा. हांडे, सहसचिव रोहिणी भालेकर, प्रादेशिक कार्यालय पुणेचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होत असलेला प्रत्येक प्रकल्प, प्रत्येक काम राष्ट्राला समर्पित महत्त्वाचे काम असते. त्यामुळे जोपर्यंत राष्ट्रीय सेवेच्या वृत्तीने काम करण्याची भावना प्रत्येकात असेल, तोपर्यंत आपल्या हातून निश्चित दर्जेदार काम होईल. कोणत्याही यंत्रणेत अधिकारी, कर्मचारी यांना काम करण्याची व्यापक संधी उपलब्ध असते. त्याचा सुयोग्य वापर करून योगदान देणाऱ्यांचा पुरस्काराने गौरव झाला पाहिजे, त्यातून चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. कर्मचाऱ्यांनीही गुणवत्तापूर्ण काम करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. आपल्या कामातून प्रत्येकजण वेगळा ठसा उमटवू शकतो, असे सांगून मंत्री श्री चव्हाण म्हणाले की, यापुढे सर्वांच्या सहकार्याने विभागाचा व्यापक विस्तार करत विभागाचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्राला वेगळं वैभव प्राप्त करून देण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. विभागाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा वाढवण्यासाठीची क्षमता आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे आहे. त्यादृष्टीने सर्वांनी अ़धिक जोमाने काम करावे. यापुढे वार्षिक पुरस्कार वितरण वेळेत करण्याकडेही लक्ष देणार असल्याचे मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.
अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर म्हणाल्या की, शासनात काम करण्याची संधी मिळणे ही महत्त्वाची बाब आहे. कोणत्याही कामाच्या यशस्वीतेत त्यात सहभागी प्रत्येकाने कामात दिलेले योगदान महत्त्वाचे असते. तसेच काम करताना समूह भावना आवश्यक आहे. आपल्या कामाची दखल घेतली गेली, ही भावना पुरस्काराने वाढते.त्यासोबतच गुणवत्तापूर्ण कामासाठीचे प्रोत्साहन मिळते. या पुढचे पुरस्कार त्याच वर्षाखेर वितरीत करण्याची दक्षता विभागामार्फत घेण्यात येईल. सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे गुणवत्ता हे समीकरण आपण सर्व मिळून प्रस्थापित करू, असे श्रीमती म्हैसकर यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील सर्व पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांना संबंधित विभागीय स्तरावर पुरस्कार वितरण करण्याच्या सूचना मंत्री श्री. चव्हाण यांनी विभागाला दिल्या होत्या त्यानुसार मुंबई, पुणे विभागातील पुरस्कार प्राप्त सर्व कर्मचाऱ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply