कोल्हापूर, 6 जून (हिं.स.) : कोल्हापूरला छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा उत्कृष्ट जिल्हा बनवण्यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कागलकर हाऊस येथे शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्याचा कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी पालकमंत्री केसरकर दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलत होते. प्रारंभी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते या ठिकाणी शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य अधिकारी मनिषा देसाई, शिल्पा पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्यासह जिल्हा परिषद व अन्य विभागांचे अधिकारी, संयोगिता चव्हाण, सई चव्हाण तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात शिरोळ तालुक्यातील घालवाड येथील आशा स्वयंसेविका तसेच नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे व अन्य कलाकारांनी शिवचरित्रातील निवडक प्रसंगांचे नृत्य- नाट्याच्या माध्यमातून सादरीकरण केले. या कलाप्रकारांना तसेच लाठीकाठीच्या प्रात्यक्षिकांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात भरभरुन दाद दिली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिधान केलेल्या अष्टप्रधान मंडळ व मावळ्यांच्या वेषभूषेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
पालकमंत्री केसरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे 350 वे शिवराज्याभिषेक वर्ष राज्य शासनाच्या वतीने उत्साहात साजरे करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे. म्हणूनच देशासह विदेशातही शिवरायांच्या विचारांचे व त्यांच्या कार्याचे आजही अनुकरण केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासक, धाडसी, पराक्रमी, शूरवीर आणि न्यायप्रिय राजे होते. प्रजाहितदक्ष असणाऱ्या शिवरायांनी राज्यकारभार करताना रयतेला न्याय देण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे इतिहासात दाखले आहेत.
शिवरायांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करावे
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे रयतेच्या कल्याणाचे होते. आदर्श विचारांप्रमाणेच त्यांचे कार्यही महान होते. छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासक होते. त्यांची निष्ठा, सचोटी आदी गुण प्रत्येकाने अंगिकारायला हवेत. शिवरायांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामाप्रति निष्ठा ठेवावी, असे आवाहन करुन कार्यक्रमात शिवराज्याभिषेकाचे सादरीकरण केलेल्या घालवाडच्या आशा स्वयंसेविकांच्या कलेचे चव्हाण यांनी कौतुक केले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply