मुंबई, 5 जून (हिं.स.) : राज्यातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी स्वतंत्र सचिव देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. प्रवीण दरेकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ , माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केंद्रीय सूक्ष्म , लघु , मध्यम विभागाचे अधिकारी व उद्योग विभाग अधिका-यांच्या सोमवारी झालेल्या संयुक्त बैठकीत राज्यात या विभागाचे उपक्रम राबविण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आल्याचेही राणे यांनी सांगितले.
राणे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात अन्य राज्यांच्या तुलनेत सूक्ष्म , लघु , मध्यम उद्योग क्षेत्रात अधिक उत्पादन व्हावे ,देशाच्या जीडीपी मध्ये राज्याचा हिस्सा वाढावा यासाठी या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. सिंधुदुर्गमध्ये एमएसएमई विभागातर्फे सुरु करण्यात येणा-या तांत्रिक केंद्राच्या जमीनीची १३ कोटींची किंमत राज्य सरकारने माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच या विभागाच्या साकी नाका येथील जमिनीवर असलेले आरक्षण उठविण्याचा निर्णय ही झाल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यात तरूण उद्योजकांना प्रोत्साहन देऊन अधिकाधीक उद्योग सुरु करून रोजगार निर्मितीवर भर दिला जाईल. निर्यात वाढवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकारच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येणार आहेत. आजची संयुक्त बैठक ही महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात प्रगतिपथावर घोडदौड करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply