रत्नागिरी, 5 जून, (हिं. स.) : नव्या व्यवस्थापनासह पुन्हा सुरू झालेल्या दाभोळ (ता. दापोली) येथील भारती शिपयार्ड कंपनीमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी भाजपा नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी व्यवस्थापनाकडे केली. कामगारांच्या अन्य मागण्यांसाठी व्यवस्थापनासोबत त्यांनी बैठक घेतली. यावेळी दाभोळ येथे कामगार संघटनेची घोषण राणे यांनी केली.
दाभोळ येथील भारती शिपयार्ड कंपनी नव्या व्यवस्थापनासह सुरू झाली आहे. मात्र स्थानिक कामगारांवर अन्याय होत आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राणे यांनी आज कंपनीला भेट दिली. दाभोळ ग्रामपंचायत सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच श्रीमती दाभोळकर, उपसरपंच जावकर, भाजपचे उत्तर रत्नागिरीचे कार्याध्यक्ष केदार साठे, जिल्हा नियोजन समिती सदस्य नीलेश सुर्वे, समर्थ कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रवीण नलावडे, नंदू चव्हाण आदी कामगार नेते व भाजपा पदाधिकारी तसेच शेकडो कामगार उपस्थित होते.
भारती शिपयार्ड कंपनी पुन्हा सुरू झाली असली तरीही कंपनीने तेथे स्थानिक कामगारांना सामावून घेतलेले नाही. कामगारांसाठी ठेवलेल्या अटी जाचक आहेत. जुन्या व्यवस्थापनाकडचा थकीत वेतनाबाबतचा प्रश्न अद्यापही निकाली निघालेला नाही. राणे यांनी कामगारांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले आणि आपण त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.
सभेनंतर राणे यांनी कामगारांसह कंपनी व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. उद्योग चालले पाहिजेत, हीच आमची भूमिका आहे, मात्र कंपनी चालताना जर स्थानिक कामगारांवर अन्याय होत असेल, ते उपाशी राहणार असतील तर आम्ही कामगारांच्या बाजूने उभे राहणार आहोत, असा स्पष्ट इशारा त्यांनी व्यवस्थापनाला दिला. कामगारांसह व्यवस्थापनाची बाजूसुद्धा त्यांनी प्रतिनिधींकडून जाणून घेतली. स्थानिकांना सामावून घेण्यासाठी तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply