परळी वैजनाथ, ३ जून (हिं.स.) : माझं राजकारण केवळ आणि केवळ लोकांसाठी आहे. त्यामुळं कायम लोकांच्या हिताची भूमिका घ्यायची ही लोकनेते मुंडे साहेबांची शिकवण आहे. मी सत्य, स्वाभिमान आणि वंचितांच्या सेवेचा वसा शेवटपर्यंत सोडणार नाही, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सांगितले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त आज गोपीनाथ गडावर ह.भ.प. रामायणाचार्य ढोक महाराज यांचं कीर्तन आणि विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी त्या बोलत होत्या. लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठी गर्दी उसळली होती.
त्या पुढे म्हणाल्या की, माझे शब्द ठाम असतात. सर्वच पक्षांमध्ये बदल असतात, माझ्या पक्षातही बदल झाले. मी मनात काही साठवून ठेवत नाही. लोकांच्या हितासाठी भूमिका घेते. भाषणातील बोलण्याचे काहीही अर्थ लावून चर्चा घडवल्या जातायत. याने कोणी व्यथित होऊन जाण्याची गरज नाही. सत्य सूर्यप्रकाशाएवढं स्वच्छ आहे. मला भुमिका घ्यायची असेल तर ती छातीठोक व जगजाहीर घेईल, असंही त्या म्हणाल्या.
मुंडे म्हणाल्या, आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक दिवस आहे. या दिवशी माझ्यासाठी राजकारण शून्य आहे. याठिकाणी जे लोक आले आहेत, त्यांना मी काही दिले नाही. मी यावेळी कोणत्याही राजकारण्यांना निमंत्रित केलेले नाही. कोणत्याही मोठ्या नेत्यांला बोलावले नाही. मी फक्त भजन कीर्तन आणि मुंडेवर निष्पाप प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम ठेवला आहे. एखादी व्यक्ती जेव्हा एखादं वक्तव्य करते तेव्हा ती व्यक्ती पत्रकार परिषद घेऊन बोलते. पण जर एखादी व्यक्ती समोरच्या व्यक्तींसमोर एका भाषणात बोलत असते, त्या भाषणाचं पोस्टमार्टम करण्याला बातमी म्हणत नाहीत. याची मला सवय झाली आहे. पण ते प्रेम समजून मी स्विकारते.
मी लोकांसाठी राजकारणात आहे. बहुजनांच्या, वंचितांच्या , समाजहिताच्या भुमिका घेतल्या तर त्यात चुकीचं काय आहे. मी मुंडे साहेबांची कन्या आहे. मला भुमिका घ्यायच्या आधी सर्वांना बोलवून सांगेन, छातीठोक भुमिका घेईल. रडगाणं गाणारी मी नाही. मला या चर्चांचा कंटाळा आला आहे. तरीही संयम ठेवू. मी लोकांसाठी राजकारणात आहे.मला कोणाकडून काहीही मिळवायचं नाही. आपली कोणावरही नाराजी नाही. आपली अपेक्षा सर्व सामान्य माणसाकडून आहे.वेळ येईल तेंव्हा तुम्ही ती अपेक्षा नक्कीच पुर्ण कराल, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply