जळगाव, 2 जून (हिं.स.) धार्मिक कार्यक्रमासोबतच सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करत मंगळग्रह मंदिराने आतापर्यंत आरोग्य शिबिरांचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करून अनेक गरजू रुग्णांची शस्त्रक्रिया घडवून आणत त्यांना जीवनदान देण्याचे कार्य केले आहे. ज्ञान, विज्ञान अन् अध्यात्माचा या मंदिरात त्रिवेणी संगम आहे. त्यामुळेच मंदिराचा लौकिक जगभरात पसरला आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास, युवक कल्याण व क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळग्रह मंदिरात आयोजित भूमिपूजन तथा विविध उपक्रमप्रसंगी व्यक्त केले. अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात श्री कालभैरव, माता श्री जोगेश्वरी व श्री गुरुदत्त यांच्या नियोजित मंदिरांच्या जागेचे भूमिपूजन संत सखाराम महाराज संस्थानचे गादिपती संतश्री प. पू. प्रसाद महाराज, मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले.यावेळी सायरनचे (भोंगा) लोकार्पण, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच पत्रकार व वृत्तपत्र वाटप करणाऱ्या बांधवांना विम्याचा लाभ आदी उपक्रमही राबविण्यात आले.
मंत्री महाजन म्हणाले, की मंगळग्रह मंदिरात येणाऱ्या देशासह विदेशातील भाविकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्या अनुषंगाने मंदिरातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला मिळाला हे माझे भाग्य समजतो. पत्रकार व वृत्तपत्र विक्रेता हा समाजातील दुर्लक्षित वर्ग राहिला आहे. अनेक पिढ्या घरोघरी वृत्तपत्र वाटपाचे काम करून उदरनिर्वाह करतात. मात्र, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आजवर कोणीही पुढे सरसावले नाही. मंगळग्रह मंदिराने या घटकाचा सकारात्मक विचार करून त्यांना विम्याचा लाभ मिळवून दिला, ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply