* छगन भुजबळांना हिंदु जनजागृती समिती प्रश्न
मुंबई, ३१ मे (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील विविध मंदिरांनी लागू केलेल्या वस्त्रसंहितेवर टीका करतांना ‘मंदिरातील पुजारी उघडेबंब असतात. त्यांना पूर्ण कपडे घालण्यासाठी सांगा’, अशी हिंदु धर्माप्रती द्वेष दर्शवणारी टीका केली. त्याचा हिंदु जनजागृती समिती तीव्र निषेध करते. धर्मशास्त्रानुसार सोवळे-उपरणे घालून पूजा-अर्चा केली जाते, ही साधी गोष्ट भुजबळ यांना माहिती नाही आणि इतरांना (हिंदूंना) ‘मूर्ख’ म्हणण्याची त्यांची हिम्मत होते. पुजार्यांना ‘उघडेबंब’ म्हणत हिणवण्याची हिम्मत होते. मक्केतील ‘काबा’चे दर्शन घेण्यासाठी जाणारे सर्व मुसलमान पुरुष ‘पुजार्यांप्रमाणेच’ कमरेच्यावर वस्त्र घालत नाहीत, त्यांना ‘अर्धनग्न’ म्हणण्याची भुजबळांमध्ये हिंमत आहे का ? मुसलमान महिलांची इच्छा असो वा नसो, त्यांच्यावर बुरख्याची सक्ती केली जाते, याला ‘मूर्खपणा’ म्हणण्याची हिंमत छगन भुजबळ, पुरोगामी आणि ब्रिगेडी मंडळी दाखवतील का ? असा परखड प्रश्न हिंदु जनजागृती समितीने केला आहे.
हेच लोक ‘हिजाब’चे समर्थन करतात आणि मंदिरांतील वस्रसंहितेवर टीका करतात, हा तथाकथित पुरोगाम्यांचा दुतोंडीपणा आहे. पोलिसांचा खाकी गणवेश, डॉक्टरांचा पांढरा कोट, वकीलांचा काळा कोट हे धर्मनिरपेक्ष शासनाने योजलेले ‘ड्रेसकोड’ चालतात. स्वत: भुजबळ हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असतांना राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत ‘वस्त्रसंहिता’ लागू केली होती. त्यानुसार अधिकारी आणि कर्मचारी यांना जीन्स पँट, टी-शर्ट, भडक रंगाचे वा नक्षीकाम असलेले वस्त्र, तसेच स्लीपर वापरता येणार नाही. केवळ शोभनीय वस्त्र घालण्याचा नियम केला होता; मात्र मंदिरात केवळ संस्कृतीप्रधान वस्त्र घालण्याचे आवाहनही यांना चालत नाही. हा भारतीय संस्कृतीद्वेषच आहे. अशी भारतीय संस्कृती विरोधी भूमिका घेणार्यांना येत्या काळात जनता धडा शिकवेल, असेही समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
लहान मुलांनी ‘हाफ पॅन्ट’ घालून मंदिरात जायचे नाही का, हा भुजबळांचा प्रश्नच मुळात बालीश आहे. लहान मुलांच्या दृष्टीने ‘हाफ पॅन्ट’ घालू नये, असे कुठेच म्हटलेले नसतांना ते हेतूतः समाजाची दिशाभूल करत आहेत. शोभनीय आणि सात्त्विक वस्रे घालण्याच्या या मोहिमेला समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंदिरे हा धार्मिक विषय आहे, यामध्ये राजकारण्यांनी लुडबूड करू नये, असेही समितीने म्हटले आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply