नवी दिल्ली, 28 मे (हिं.स.) : बिन पानी सब सून, ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. म्हणजे पाण्याविना जीवनात संकट कायम असतेच, व्यक्ती आणि देशाचा विकास ठप्प होत असतो. भविष्यातील हे आव्हान लक्षात घेता, आज देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवरांचे निर्माण केले जात आहे. आमचे अमृत सरोवर, यासाठी विशेष आहे की, हे स्वातंत्र्याच्या अमृतकाळात तयार केले जात आहे आणि यात लोकांचे अमृत प्रयत्न लागले आहेत. आपल्याला हे जाणून आनंद होईल की आतापर्यंत देशात ५० हजाराहून अधिक अमृत सरोवरांची निर्मिती झाली आहे. जल संरक्षणाच्या दिशेने हे एक खूप मोठं पाऊल आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. ‘मन की बात’च्या १०१ व्या भागातून कार्यक्रमातून त्यांनी देशवासियांशी संवाद साधला.
छत्तीसगढमधील युवकांची पाणी वाचवा मोहीम अभिनंदनास्पद
अनेक युवक नाविन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम करत आहेत, तर काही युवक असे आहेत की जे समाजाला जागरूक करण्याच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत जसे की छत्तीसगढच्या बालोद जिल्ह्यातील युवक आहेत. इथल्या युवकांनी पाणी वाचवण्यासाठी एक मोहीम सुरू केली आहे. हे युवक घरोघरी जाऊन लोकांना पाणी वाचवण्याविषयक जागरूक करतात. जेथे कुठे विवाह समारंभांचं आयोजन केलं जातं, तिथं या युवकांचा गट जाऊन पाण्याचा दुरूपयोग कसा रोखला जाऊ शकतो, यावर त्यांना माहिती देतात. पाण्याच्या सदुपयोगाशी जोडलेला एक प्रेरणादायक प्रयत्न झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातही होत आहे. खुंटीच्या नागरिकांनी पाणी संकटापासून वाचण्यासाठी बोरी बांधचा मार्ग काढला आहे, ज्याचा उपयोग गावातून वाहणाऱ्या नाल्यांवर बांध घातला जातो. या बांधांवर पाणी एकत्र आल्यानं तिथं भाजीपालाही तयार होऊ लागला आहे. त्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढत आहे आणि प्रदेशाच्या गरजांचीही पूर्तता होत आहे. लोकसहभागाचा कोणताही प्रयत्न कसा अनेक परिवर्तन घडवू शकतो, याचं खुंटी एक आकर्षक उदाहरण बनला आहे. मी तिथल्या लोकांना त्यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो.
वीर सावरकरांचं व्यक्तिमत्व दृढता आणि विशालतापूर्ण
आज (२८ मे) महान स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकरजी यांची जयंती आहे. त्यांचा त्याग, धाडस आणि संकल्पशक्तीशी जोडलेली अनेक कथा आजही आम्हाला प्रेरित करत असतात. मी तो दिवस विसरू शकत नाही की, जेव्हा मी अंदमानातील त्यांच्या कोठडीत गेलो होतो. जिथं वीर सावरकरांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. वीर सावरकर यांचं व्यक्तिमत्व दृढता आणि विशालतेनं संपूर्ण युक्त होतं. त्यांच्या निर्भीड आणि स्वाभिमानी स्वभावाला गुलामीची मानसिकता अजिबात पसंत नव्हती. स्वातंत्र्य आंदोलनातच नव्हे तर सामाजिक समानता आणि सामाजिक न्यायासाठीही वीर सावरकर यांनी जितकं केलं, त्याच्या आठवणी आजही काढल्या जातात.
भारताची ताकद त्याच्या विविधतेत
भारताची ताकद त्याच्या विविधतेत आहे. आमच्या देशात पहाण्यासारखं खूप काही आहे, हे लक्षात घेऊनच, शिक्षण मंत्रालयानं युवासंगम नावाचा एक उत्तम पुढाकार आयोजित केला. या पुढाकाराचा उद्देष्य नागरिकांमध्ये परस्पर संबंध वाढवण्याबरोबरच देशातील युवकांना आपसात मिळून मिसळून रहाण्याची संधी देणं हाही होता. वेगवेगळ्या राज्यांच्या उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थांना यात जोडण्यात आलं आहे. युवासंगम मध्ये युवक दुसऱ्या राज्यांच्या शहरे आणि गावांमध्ये जातात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटण्याची संधी मिळते. युवा संगमच्या पहिल्या फेरीत जवळपास १२०० युवकांनी देशाच्या २२ राज्यांचा दौरा केला आहे. जे युवक याचा भाग बनले आहेत, ते आपल्यासमवेत अशा स्मृती घेऊन आले आहेत की ज्या स्मृती जीवनभर त्यांच्या ह्रदयात कायम रहातील. आम्ही पाहिलं आहे की, अनेक मोठ्या कंपन्यांचे सीईओ, व्यावसायिक नेते यांनी बॅगपॅकर्सप्रमाणे भारतात वास्तव्य केलं आहे. मी जेव्हा दुसऱ्या देशांच्या नेत्यांना भेटतो, तेव्हा अनेकदा तेही सांगतात की, ते तरूण असताना भारतात फिरण्यासाठी आले होते. आमच्या भारतात इतकं काही पहाण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी आहे की आपली उत्सुकता प्रत्येक वेळा वाढतच जाते. मला आशा आहे की या रोमांचक अनुभवांना जाणून घेऊन आपल्यालाही देशाच्या वेगवेगळ्या भागांचा दौरा करण्यासाठी अवश्य प्रेरणा मिळेल.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply