नवी दिल्ली, 28 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसद भवनाच्या नव्या वास्तूचे उद्घाटनानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सर्व देशवासियांचे अभिनंदन केले आहे.
यानिमित्ताने शहा यांनी काही ट्विट संदेश केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाच्या नव्या वास्तूचे राष्ट्राला लोकार्पण केले आहे असे अमित शहा यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे. ही वास्तू म्हणजे केवळ लोकांच्या आशा आकांक्षांची पूर्तता करणारे ठिकाणच नाही, तर अमृत काळात प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्कृष्टता गाठण्याच्या भारताच्या प्रवासाची सुरुवात आहे, असेही ते आपल्या ट्विट संदेशात म्हणाले.
नव्या संसद भवनाच्या वास्तूची उभारणी विक्रमी वेळेत करत राष्ट्राच्या स्वप्नाची पूर्तता करणाऱ्या श्रमयोग्यांच्या कठोर मेहनतीप्रति केंद्रीय गृहमंत्र्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदभवनात सेन्गोल या राजदंडाची प्रतिष्ठापना करून भारताचा सांस्कृतिक वारसा आणि वर्तमान यांची सांगड घातली आहे असे अमित शहा म्हणाले. आपल्या समृद्ध संस्कृतीत असलेले धर्म आणि नीतीमत्तेसह आचरण करण्याचे महत्व काय आहे याची आठवण, हा राजदंड भारतातील येणाऱ्या पिढ्यांना सदैव करून देत राहील, असेही अमित शहा यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply