लातूर, 26 मे (हिं.स.) : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमामुळे शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली थेट मिळत आहे. त्यामुळे उदगीर आणि जळकोट तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन विविध योजनांची माहिती करून घ्यावी. तसेच ज्या योजना तुमच्या आर्थिक विकासासाठी फायद्याच्या आहेत त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार संजय बनसोडे यांनी केले.
उदगीर येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आ. बनसोडे बोलत होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, उदगीरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
उदगीर आणि जळकोट तालुक्यात शासनाच्या विविध मोठ्या योजनांची कामे सुरु असून त्यात 182 गावांना शाश्वत पाणी पुरवठा ही अत्यंत महत्वाची योजना आहे. या मोठ्या योजनांबरोबरच वैयक्तिक लाभाच्या विविध योजना ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामुळे आपल्या समोर आल्या आहेत. कृषि आणि कृषि पूरक व्यवसायासाठी विविध महत्वपूर्ण योजनांची माहिती येथील स्टॉलमुळे सर्वसामान्यांना मिळत आहे. त्यामुळे शासनाच्या अशा उपक्रमाला नागरिकांनी मुद्दाम भेट द्यायला हवी, असे मत आमदार श्री. बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केले. जनतेला विविध कल्याणकारी योजना कळाव्यात, त्यांच्या प्रगतीसाठी शासनाच्या कोणत्या योजनेचा हातभार लागू शकेल, याची माहिती व्हावी, यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे शासनाच्या बहुतांश योजना आता ऑनलाईन झाल्या आहेत, त्यात पारदर्शकता आहे. त्यामुळे नागरिकांनी हे ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले. ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम एवढ्या पुरता मर्यादित नसून तो महसूल मंडळस्तरापर्यंत घेऊन जाणार आहोत, असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. फक्त या शिबिरापुरते नाही तर यापुढे आमचे कर्मचारी गावोगावी जाऊन शासनाच्या ग्रामविकासाच्या योजना लोकांना सांगणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply