सोलापूर, 23 मे (हिं.स.) कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारलेले नाराज उमेदवार काँग्रेस किंवा जनता दल (एस) मध्ये गेले. यात अगदी माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदारांचा समावेश होता. गेल्या दहा वर्षांत कधी नव्हे अशी नेत्यांची गळती दिसून आली. तोच कित्ता भाजपमधील नाराज नेते आगामी महापालिकेच्या निवडणुकीत गिरवण्याची चिन्हे दिसत आहेत. झालेल्या कार्यक्रमात माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
भाजपमध्ये अपमान केल्याचा आरोप करत त्यांनी स्थानिक पक्ष नेतृत्वावर तोफ डागली. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या स्थानिक नेत्यांतील धुसफूस आता बाहेर पडत आहे. प्रा. निंबर्गी यांनी, ‘शहरात भाजपात कोणाला मोठे होऊ दिले जात नाही. मागील तीन वर्षांपासून भाजपात घुसमट होत आहे’, असा आरोप केला. तर भाजपमधील मालकशाहीमुळे इतर नेत्यांचा निभाव लागत नसल्याचे माजी नगरसेवक पाटील यांनी बोलून दाखवले. दुसरीकडे काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवून दिला. त्यामुळे काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे नक्की झाले आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply