चंद्रपूर, २३ मे, (हिं.स.) – बनावट कागदपत्र तयार करून आदिवासी महिलेची दिलीप राजगुरे नामक व्यक्तीने जमीन हडपल्याचे प्रकरण आम आदमी पार्टीने उजेडात आणले आहे. दरम्यान, आपने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून जमीन पीडित महिलेला परत मिळवून देण्यासाठी उभारण्यात आलेल्या लढ्याला यश आले. अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ही रजिस्ट्री रद्द करीत महिलेला न्याय दिला आहे. मात्र, याप्रकरणातील सूत्रधार दिलीप राजगुरे आणि त्याला सहकार्य करणारे शासकीय अधिकारी यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी आम आदमी पार्टीने मंगळवारी पत्रकार परिषदेत केली आहे.
जैनाबाई दामोधर पेंदाम या महिलेची दुर्गापूर येथे चार एकर जमीन आहे. या जमिनीची किमत कोट्यवधींची आहे. दिलीप राजगुरे या व्यक्तीने पीडित महिलेला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावावर तिच्याकडून कोऱ्या कागदवार अंगठे घेतले. तिचा विश्वास संपादन करण्यासाठी तिच्या घराशेजारी असलेल्या काही व्यक्तींना आर्थिक मोबदला देत तिला तहसील कार्यालयात आणले. कचरीबाई दुर्वे नामक महिलेला स्वत:ची पत्नी दाखवून आणि सायवन येथील रहिवासी असल्याचे दाखवून तिच्या नावाने बनावट कागदपत्र तयार करून जैनाबाईच्या जागेची विक्रीपत्र करून दिलीप राजगुरे यांनी जमीन हडपली. हा प्रकार निदर्शनास येताच पीडित महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आम आदमी पार्टीला प्रकरणाची माहिती होताच त्यांनी प्रकरणाचा पाठपुरावा केला. कागदपत्रांची तपासणी करून अधिक माहिती घेतली असता कचरीबाई नामक कोणतीही महिला सायगावात नसल्याची बाब पुढे आली. राजगुरे याने तिच्या नावाने बनावट जातप्रमाणपत्र आणि अन्य कागदपत्र तयार करून शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी घेत जैनाबाईची चार एकर जमीन हडपल्याचा आरोप आपचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी केला.
या प्रकरणात दिलीप राजगुरेसोबत शासकीय अधिकाऱ्यांचाही सहभाग असून, महिलेची फसवणूक केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देणार असल्याची माहिती मुसळे यांनी दिली. दरम्यान राजगुरेसह अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी पोलीस अधीक्षकांकडे करणार असल्याचेही मुसळे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पीडित महिला जैनाबई पेंदाम, कायदेशीर सल्लागार ॲड. बल्की, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, योगेश गोखरे आदी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply