ठाणे, २१ मे, (हिं.स)- ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने केलेल्या मागणीनुसार ठाणे विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पत्रकार संघाला ४ संगणक संच भेट दिले आहेत. पत्रकार म्हटले की कागद आणि पेन या दोन महत्त्वाच्या वस्तू पूर्वीच्या काळात हाताळल्या जात होत्या. मात्र आधुनिक काळात मोबाईल आणि संगणकीय युग असल्याने पत्रकारिता क्षेत्रातही बदल झाले आहेत.याच अनुषंगाने पत्रकार तसेच छायाचित्रकारांना संगणकाची अत्यंत गरज भासत असल्याने पत्रकार संघाला आ. संजय केळकर यांच्याकडून ४ संगणक भेट देण्यात आले आहेत.
सध्याच्या काळात संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून वेब पत्रकारिता उदयास आली आहे. सोशल मीडिया,वेब न्यूज पोर्टल्स,वेब चॅनल्स, ट्विटर, फेसबुक, व्हाट्सअप, युट्युब यांसारख्या वेब माध्यमांचे जाळे पसरले असल्याने सर्वच कामे संगणकाशिवाय होऊ शकत नाही. याच पार्श्वभमीवर ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने भाजपचे आमदार संजय केळकर यांच्याकडे संगणकाची मागणी केली होती.
यापूर्वी देखील केळकर यांनी संघाला ५ संगणक भेट दिले होते. मात्र पत्रकारांच्या वाढत्या सदस्यामुळे संगणक अपुरे पडत असल्याने नवीन ४ संगणक केळकर यांनी भेट म्हणुन दिले. यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या उपस्थितीत पत्रकार कक्षेत पहिल्या टप्यात २ संगणक सुपूर्द करण्यात आले. तर येत्या काही दिवसांत उर्वरित २ संगणक देण्यात येणार असल्याची ग्वाही केळकर यांनी दिली. यावेळी परिवहन सदस्य विकास पाटील, कार्याध्यक्ष विकास काटे, खजिनदार विभव बिरवटकर यांच्यासह कार्यकारणी सदस्य आणि अनेक पत्रकार उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply