नवी दिल्ली, 16 मे (हिं.स.) : केंद्रात भाजपच्या सत्ता रोहणाला मंगळवारी 16 मे रोजी 9 वर्षे पूर्ण झालीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 71 हजार सरकार नोकऱ्यांची नियुक्ती पत्रे जारी करताना 16 मे 2014 रोजी भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचे स्मरण केले. या विजयानंतर केंद्रात 28 मे 2014 रोजी भाजपचे सरकार अस्तित्वात आले होते.
केंद्र सरकारने 2023 – 2024 या आर्थिक वर्षासाठी 10 लाख नोकऱ्या देण्याचे टार्गेट ठेवले आहे. केंद्र सरकारच्या सेवेतील सर्व रिक्त पदे या निमित्ताने भरली जातील. त्यापैकी 71 हजार नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे पंतप्रधानांच्या हस्ते जारी करण्यात आली. या विशेष समारंभा निमित्त केलेल्या भाषणात मोदींनी 9 वर्षांपूर्वीच्या विजयाचे स्मरण केले. यावेळी मोदी म्हणाले की, 9 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले होते. देशात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. एक नवा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला होता. सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन करोडो भारतीयांनी त्यानंतर अथक– अखंड वाटचाल केली. आज उत्साहाने भरलेला भारत विकसित भारताच्या दिशेने वेगाने पुढे निघाला आहे. विकसित भारताची ही यात्रा अशीच पुढे सुरू राहील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply