Home राजकारण पवारांनी मोदींवर बोलावले याला किती महत्त्व द्यावे…?

पवारांनी मोदींवर बोलावले याला किती महत्त्व द्यावे…?

पवारांनी मोदींवर बोलावले याला किती महत्त्व द्यावे...?

मुंबई, 13 मे (हिं.स.) : कर्नाटकच्या निकालावर प्रतिक्रीया देताना पवारांनी भाजपवर तोंडसुख घेतले त्याला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीला कर्नाटक निवडणुकीत 0.5 टक्क्यांहून कमी मते मिळाली आहेत. तेव्हा पवारांच्या मोदींवर बोलण्याला किती महत्व द्यावे ? असा खोचक प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केलाय.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सुरू झालेला कलगीतुरा थांबण्याचे नाव घेत नाही. प्रचारादरम्यान फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हंटले होते. त्यावर राष्ट्रवादीचे नेते संतप्त झाले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यावर “भाजप आणि नैतिकते हे विरोधाभासी शब्द आहेत” असे शरद पवार म्हणाले होते. त्याला फडणवीसांनी लगेच उत्तर देत “पवारांनी नैतिकतेच्या गोष्टी करू नये, वसंतदादा पाटलांचे सरकार पाडले तिथून पवारांबदद्ल बोलावे लागेल. नैतिकता आणि पवार यांचा संबंध काय ?” असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला होता.

या वादाचा नवा राजकीय अध्याय शनिवारी कर्नाटकचे निकाल जाहीर झाल्यावर पहायला मिळाला. राज्यातील 224 पैकी भाजपला 64 जागा मिळाल्या असून काँग्रेस 136 जागांवर विजयी झाली आहे. निवडणुकीचा हा निकाल 2024 मध्ये मोदींच्या पराभवाची नांदी असल्याचे पवारांनी सांगितले. त्यांच्या या टीकेला फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेय. यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेसला 0.5 टक्क्यांपेक्षाही कमी मते मिळाली आहेत. निपाणीतला त्यांचा उमेदवार पार्सल पॅक करून पाठवून द्या, असे मी सांगितले होते. निपाणीच्या जनतेने माझे ऐकले. पण शरद पवार जर मोदी हे तो मुनकीन है असे राहिले नाही, असे बोलत असतील तर त्यांच्या प्रतिक्रियेला किती महत्त्व द्यायचे..?, असा खोचक सवाल फडणवीस यांनी केला.

कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी आणि बाकीच्या प्रादेशिक नेत्यांनी महाराष्ट्र जिंकला. देश जिंकला, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत पण ती वस्तुस्थिती नाही. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात स्थानिक महापालिका, नगरपालिका निवडणुकीत भाजपचा प्रचंड विजय झाला आहे. त्यामुळे विरोधकांचे देश जिंकण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी देखील कर्नाटकात काँग्रेसच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना या शब्दांत त्यांची संभावना केली. कर्नाटक निवडणुकीत ठाकरे गटाचा एकही उमेदवार नव्हता. त्यांच्या पक्षाचे नेते अस्तित्वही नाही. त्यांच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करायची..? असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.