मुंबई, ९ मे (हिं.स.) : मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. लग्नाच्या वाढदिवशीच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर आणि दोन मुले आहेत.
शिवसेनेत फूट पडल्यानंतरही महाडेश्वर हे उद्धव ठाकरे यांच्याशी कायम एकनिष्ठ राहिले. लग्नाच्या वाढदिवशी बायकोला शुभेच्छा दिल्यानंतर मध्यरात्री २ वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. दिवंगत महाडेश्वर मागील दोन दिवस कोकण दौऱ्यावर गेले होते. रायगड येथील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेलाही त्यांनी हजेरी लावली होती. दोन दिवसांच्या दगदगीनंतर मुंबईत परतल्यावर सोमवारी त्यांच्या छातीत दुखू लागले. मनपाच्या केईएम रुग्णालयात जाऊन उपचार करून घरी गेले. परंतु, मध्यरात्री २ वाजता हृदयविकाराचा झटका त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सांताक्रूझ पूर्व राजे संभाजी विद्यालयात दुपारी २ वाजता ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी ४ वाजता टीचर्स कॉलनी येथील स्मशानभूमीच्या दिशेने अंत्ययात्रा निघणार आहे.
ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या वांद्रे विधानसभा मतदार संघातील नेते, शिवसेनेचे खंदे समर्थक, अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि ठाकरेंचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. माजी महापौर महाडेश्वर यांच्या निधनाने शिवसैनिकांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
सामाजिक कारकीर्द
महाडेश्वर २००२ मध्ये बृहन्मुंबई महापालिकेतील नगरसेवक म्हणून निवडून आले होते. २००३ बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष झाले. २००७, २०१२, २०१७ मध्ये बृहन्मुंबई महापालिकेतील नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले. २०१७ मध्ये महापालिकेच्या महापौरपदी त्यांची वर्णी लागली. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून महाडेश्वर यांनी निवडणूक लढवली. शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांची बंडखोरी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्या होत्या.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply