सातारा, 1 मे (हिं.स.) : जिल्ह्यात ३० एप्रिल रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 3 हजार 615 प्रकरणे निकाली निघाल्याची माहिती प्राधिकरणाचे सचिव तथा वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश तृप्ती जाधव यांनी दिली.लोक अदालतीस प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे, अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. जिल्हा न्यायाधीश ए. एस. जाधव, एस. आर. सालकुटे, सर्व पॅनेल प्रमुख न्यायिक अधिकारी, सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात एकूण ९९५८ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी प्रलंबित प्रकरणे २२९९ तडजोडीने निकाली निघाली. त्यामध्ये एकूण रक्कम २४ कोटी ०६ लाख ४१ हजार ३२२ रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच वादपूर्व ६१५९ प्रकरणे ठेवण्यात आली, त्यापैकी तडजोडीने १३१६ प्रकरणे निकाली निघाली. वादापूर्वमध्ये एकूण १ कोटी ६० लाख २४ हजार ८६४ एवढी रक्कम वसूल करण्यात आली. अशी एकूण ३६१५ प्रकरणे निकाली निघाली. २५ एप्रिल ते २९ एप्रिल या स्पेशल ड्राईव्ह कालावधीमध्ये जिल्ह्यात एकूण ५३७ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. राष्ट्रीय लोक अदालतीकरिता गर्दीवर नियंत्रण करण्याकरिता विशेष पोलीस पथक स्थापन करण्यात आले होते.
प्रलंबित प्रकरणांमध्ये वैवाहिक वाद, तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी केसेस, भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कर्ज, धनादेश न वठल्याची प्रकरणे, इत्यादींचा समावेश आहे. वादपूर्व प्रकरणात फायनान्स कंपन्या, बँकांची कर्ज, दूरध्वनी व विद्युत देयके आणि ग्रामपंचायत मालमत्ता पाणी पट्टी कर वसुली प्रकरणे इ. प्रकरणांचा समावेश होता. जिल्ह्याचे ठिकाणी एकूण ७ आणि तालुका न्यायालयात एकूण २९ पॅनेल करण्यात आले होते. पॅनेल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश, वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश यांनी काम पाहिले. प्रत्येक पॅनलवर एक विधिज्ञ पॅनल सदस्य म्हणून काम पाहत होते. लोक अदालत यशस्वी होण्याकरिता पक्षकार, विधिज्ञ, सर्व न्यायीक अधिकारी, पोलीस, विधी स्वयंसेवक आणि सर्व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रीय लोक अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून भविष्यात आणखी प्रबोधन आणि प्रयत्न करणार असल्याचीही माहिती प्राधिकरणाचे सचिव तथा वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश जाधव यांनी दिली.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply