नवी दिल्ली, 26 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या मासिक कार्यक्रमाचे प्रसारण देशातल्या शंभर कोटी पेक्षा जास्त जनतेपर्यंत पोहोचले आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल आज नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनामध्ये मन की बात या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. भारताचे उप राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. “मन की बात” च्या विविध भागांमध्ये पंतप्रधानांनी ज्यांचा उल्लेख केला आहे, असे देशाच्या विविध भागांतील 100 पेक्षा जास्त प्रतिष्ठित नागरिकही या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी ‘नारी शक्ती’, ‘विरासत का उत्थान’, ‘जन संवाद से आत्मनिर्भरता’ आणि ‘आह्वान से जन आंदोलन’ या व्यापक विषयांवर विचार मंथन करणारी चार पॅनल चर्चा सत्रे आयोजित करण्यात आली होती.
उद्घाटन सत्रानंतर नारी शक्ती या विषयावरील सत्र झाले, ‘मन की बात’ च्या जवळजवळ सर्वच भागांमध्ये या विषयाचा समावेश होता, आणि तो पंतप्रधानांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. महिलांना प्रभावीपणे सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना राष्ट्र उभारणीत आघाडीवर आणण्यासाठी मन की बातने देशात जो परिवर्तनात्मक प्रभाव पाडला, तो सत्रांनी अधोरेखित केला. भारताच्या प्रगतीचा मध्यवर्ती आयाम म्हणून आणि भारताला बळकट करण्याची गरज म्हणून पंतप्रधानांनी महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर भर दिला आहे. गेल्या नऊ वर्षांत, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांनी भारताच्या विकासाच्या प्रवासाचे नेतृत्व करावे, यासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. प्रख्यात सादरकर्त्या ऋचा अनिरुद्ध यांनी चर्चेचे सूत्रसंचालन केले आणि पॅनेलमधील मान्यवर सदस्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. किरण बेदी, आयपीएस (निवृत्त) आणि माजी नायब राज्यपाल, पुद्दुचेरी, दीपा मलिक- ऍथलीट, रवीना टंडन- अभिनेत्री, धीमंत पारेख- संस्थापक आणि सीईओ, द बेटर इंडिया, आरजे नितीन, निखत जरीन- बॉक्सर आणि पूर्णा मलावथ- गिर्यारोहक, यांचा यात समावेश समावेश होता. मालावथ, ही 2014 मध्ये एव्हरेस्टवर चढणारी जगातील सर्वात तरुण मुलगी आहे. तिने 2022 मध्ये सात शिखरांचे पर्वतारोहणाचे आव्हान पूर्ण केले होते, आणि जून 2022 मध्ये मन की बातमध्ये पंतप्रधानांनी तिची प्रशंसा केली होती.
‘पराया धन’ ही संकल्पना बदलण्याची गरज – किरण बेदी
किरण बेदी यांनी आपल्या सुरुवातीच्या संबोधनात सांगितले की, जर आपल्याला या देशात बदल पहायचा असेल तर आपल्याला पालक आणि वडिलधाऱ्या व्यक्तींची मानसिकता बदलावी लागेल, कारण हीच मानसिकता मुलांमध्ये आणि कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये संक्रमित होते. त्या म्हणाल्या की, ‘पराया धन’ ही संकल्पना बदलण्याची गरज आहे, कारण ती महिलांना असुरक्षित बनवते आणि आपण महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देऊन त्यांना स्वावलंबी बनवले, तरच महिलांना आपण प्रबळ झालो, असे वाटेल. बेदी पुढे म्हणाल्या की, पालकांनी मुलांमध्ये समानतेचा संदेश आणि समान शिक्षण आणि कौशल्याची मुल्ये बिंबवणे आवश्यक आहे. मुलींमध्ये ही जाणीव निर्माण व्हायला हवी की, घर चालवणे आणि पालकांची काळजी घेणे ही आपलीही जबाबदारी आहे. महिला सक्षमीकरणासाठी, आर्थिक स्वातंत्र्य, शिक्षण आणि कौशल्ये आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी महिला, या तीन गोष्टींवर भर देत, यासाठी महिलांनी खेळ खेळणे आवश्यक आहे, असे बेदी म्हणाल्या.
महिलांचे सक्षमीकरण करणे ही पुरुषांची जबाबदारी – आरजे नितीन
बदलाचे व्यासपीठ म्हणून रेडिओच्या महत्त्वाविषयी बोलताना आरजे नितीन म्हणाले की, रेडिओ हे प्रभावी माध्यम आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे आणि गेली 23 वर्षे ते या माध्यमात काम करत आहेत. महिलांचे सक्षमीकरण करणे ही पुरुषांची जबाबदारी आहे आणि जर तुम्ही तुमच्या आई आणि बहिणीवर खरोखर प्रेम कराल, तर तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी काम कराल आणि सर्व स्त्रिया त्यांच्या स्वत: च्या संधी शोधण्यासाठी सक्षम आहेत हे सुनिश्चित करा, असे ते म्हणाले. संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी रेडिओ हे चांगले माध्यम आहे आणि म्हणूनच पंतप्रधानांनीही हे माध्यम निवडले, कारण या माध्यमात ही सर्वाधिक ताकद आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली, याबद्दल आपल्याला आनंद वाटत असून, महिला सक्षमीकरणासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे सांगून त्यांनी आपल्या निवेदनाचा समारोप केला.
वैवाहिक लैंगिक शोषण समस्या आजही कायम – रवीना टंडन
अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून कलेबद्दल बोलताना रवीना टंडन म्हणल्या की, आपल्याला सशक्त महिला पात्रे आणि महिला सक्षमीकरणाची संकल्पना असलेले चित्रपट करायला मिळाले. चित्रपट उद्योगात असे अनेक बदल झाले आहेत, जे 90 आणि त्यापूर्वीच्या दशकांमध्ये नव्हते, असे त्या म्हणाल्या. कलाकारांना सामाजिक समस्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी संघर्ष करावा लागला, असा एक काळ होता, कारण ते चित्रपट बॉक्स ऑफिससाठी अनुकूल समजले जात नव्हते, किंवा ते चित्रपट निराशाजनक असून, प्रेक्षकांना आवडत नाहीत, असे मानले जात होते, असे त्या म्हणाल्या. टंडन म्हणाल्या की, आपण जास्तीत जास्त सकारात्मक सामाजिक संदेश देणारे चित्रपट करण्याचा प्रयत्न केला. दमन हा 2000 सालातला चित्रपट होता आणि आज तेवीस वर्षानंतरही वैवाहिक लैंगिक शोषण ही समस्या आहे. त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, हे योग्यच होते, कारण तो काळाच्या पुढे होता आणि आजही आपण याच समस्यांवर चर्चा करत आहोत, असे त्या म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, समाजात सुधारणा झाली आहे. महिलांना सर्व प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये, उद्योगात अधिक सामावून घेतले जात आहे, आणि त्यांच्यामध्ये संवेदनशीलता आणि समस्यांची समज असल्यामुळे त्यांच्यासाठी अधिक संधीही आहेत. आज या उद्योगात महिलांना त्यांच्या पुरुष समकक्षांपेक्षा जास्त पगार दिला जातो आणि त्या टीव्ही उद्योगावर राज्य करतात. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही महिलांचे राज्य आहे. चित्रपट उद्योग हळूहळू पण निश्चितपणे या दिशेने वाटचाल करत आहे. महिलांनी ही भिंत भेदली आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. संपूर्ण जगात भारतामध्ये महिला वैमानिकांची संख्या सर्वाधिक आहे. शेवटी त्या म्हणाल्या की, भारताला अजूनही विकसनशील देश असे म्हटले जाते, पण प्रगतीच्या बाबतीत भारतातील महिलांनी मोठी झेप घेतली असून, सर्व सीमा पार करत जगाला कसे मागे सोडले आहे, हे त्यांना समजत नाही.
रेडियो हे एक प्रभावी माध्यम असून, पंतप्रधान मन की बात च्या जवळजवळ सर्व भागांमध्ये महिला सक्षमीकरणाबद्दल बोलले होते, याचा उल्लेख करून, रवीना टंडन म्हणाल्या,“मन की बातचे 100 भाग यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल, सर्वात प्रथम मी, प्रसार भारती आणि मोदीजींचे अभिनंदन करते”.
रेडिओची पोहोच विशाल आहे, आणि बदलाचे एक अतिशय शक्तिशाली माध्यम आहे आणि पंतप्रधान ज्याप्रकारे बोलतात त्यामुळे ती प्रत्येकाला त्यांची स्वतःची गोष्ट वाटते असे त्या म्हणाल्या. सर्व गावे आणि घराघरांत पोहोचणे ही पंतप्रधानांची मन की बातची कल्पना होती, विशेषत: पंतप्रधानांनी रेडिओद्वारे तळागाळातील खर्या नायकांचे ज्याप्रकारे कौतुक केले ही एक उत्तम कल्पना आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला स्पर्श करण्यात ती अत्यंत यशस्वी ठरली आहे असे त्यांनी सांगितले. .
परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रेरणा आणि जागरुकता यांची गरज – धीमंत पारेख
मुलींसोबत सेल्फी, आवास योजना आणि इतर महत्त्वाच्या योजनांबद्दल बोलताना धीमंत पारेख म्हणाले, आम्ही अनेक सकारात्मक आणि प्रेरणादायी कथा प्रकाशित करतो आणि त्या सर्वांचे नेतृत्व महिला करतात आणि संपूर्ण चमूचे नेतृत्व महिला करतात. परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रेरणा आणि जागरुकता या दोन गोष्टींची गरज आहे आणि मन की बातने या दोन गोष्टी सुंदरपणे एकत्र आणल्या आहेत, असे ते म्हणाले. मन की बातने आपल्याला प्रेरणा दिली आहे आणि आपण काय करू शकतो याची जाणीव करून दिली आहे.
उघड्यावर शौच आणि स्वच्छतेबद्दल बोलताना ते म्हणाले की पंतप्रधानांनी एका महिलेबद्दल सांगितले, जिचे लग्न झाले आणि तिला समजले की ती लग्न करून आलेल्या गावात शौचालये नाहीत, तिने सर्व महिलांना एकत्र येण्यास सांगितले , याचिका दाखल केली आणि त्यांच्या गावात 75 शौचालये बांधण्यात आली. आणि ती एवढ्यावरच थांबली नाही, ती परत तिच्या माहेरी गेली आणि तिथे आणखी शौचालये बांधून घेतली , अशा प्रकारे तिने दोन गावे सुधारली आणि हेच खरे महिला सक्षमीकरण आणि नारी शक्ती आहे जी प्रेरणा किती महत्त्वाची आहे हे दाखवते आणि तेच मन की बात यशस्वीपणे करत आहे.
निखत झरीन पंतप्रधानांसोबतच्या भेटीबद्दल बोलताना म्हणाली की, जेव्हा तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि पंतप्रधान मोदींनी तिला आमंत्रित केले. तेव्हा तिने यापूर्वी त्यांना फक्त टीव्ही किंवा सोशल मीडियाद्वारे पाहिले होते,मात्र जेव्हा ती त्यांना भेटली तेव्हापंतप्रधान इतके अनौपचारिक आणि शांत होते की तिला असे वाटले नाही की ती पंतप्रधानांशी बोलत आहे, तिला असे वाटले की ती आपल्या कुटुंबातील एखाद्या मोठ्या व्यक्तीशी बोलत आहे. ती म्हणाली की “ बॉक्सिंगमागे तिला तिच्या वडिलांचा पाठिंबा होता आणि पंतप्रधानांनी माझी सेल्फीची इच्छा पूर्ण केली आणि राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेनंतर मी त्यांना पुन्हा भेटले आणि कौतुकाचे प्रतीक म्हणून त्यांना बॉक्सिंग ग्लोव्हज भेट दिले, पंतप्रधानांना भेटणे हा एक चांगला अनुभव आणि प्रेरणा होती. कारण ती एका खेडेगावातून आली आहे आणि ते खूप मोठी प्रेरणा होती.”
पंतप्रधान केवळ विजेत्यांनाच समर्थन देत नाहीत तर जे खेळाडू हरतात त्यांना प्रोत्साहन देतात आणि प्रेरीतही करतात याविषयी माहिती देताना झरीन म्हणाली “जेव्हा मला दुखापत झाली, तेव्हा मी एक वर्ष बॉक्सिंगपासून दूर होते आणि लोक म्हणू लागले की मी पुनरागमन करू शकणार नाही. आणि माझे करिअर संपले , मात्र माझ्या कुटुंबाने मला पाठिंबा दिला आणि मी पुनरागमन केले. ती पुढे म्हणाली, “उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात मात्र आपले पंतप्रधान आम्हाला नेहमीच प्रेरणा देतात आणि प्रोत्साहित करतात , जिंकणे किंवा हरणे महत्त्वाचे नाही आणि पंतप्रधान प्रेरणा देत राहतात आणि खेळत राहण्यास सांगतात. पंतप्रधानांमध्ये हा एक मोठा गुण आहे.”
पूर्णा मालवथ, जिने वयाच्या 13 व्या वर्षी एव्हरेस्टवर चढाई केली , ती म्हणाली “मी जगातील सर्वात उंच पर्वत चढू शकेन असे मला कधीच वाटले नव्हते आणि नंतर भारताच्या पंतप्रधानांना भेटणे हे देखील पूर्णपणे अनपेक्षित होते. मी एका छोट्या शहरातून आले आहे आणि पंतप्रधानांना जवळपास तासभर भेटणे हा माझ्या आयुष्यातील एक मोठा क्षण होता आणि ते माझ्याशी कुटुंबातील सदस्यासारखे मैत्रीपूर्ण वातावरणात बोलले आणि ते खूप प्रेरणादायी होते आणि मला त्यांचा मोठा पाठिंबा मिळाला.” असे ती म्हणाली. आयुष्यावर इतका मोठा प्रभाव पाडल्याबद्दल मला मोदीजींचे आभार मानायचे आहेत. मी गरीब आदिवासी कुटुंबातील मुलगी आहे, माझे आई-वडील शेतकरी आहेत आणि संधी कमी आहेत, मात्र आता लोक मला ओळखतात कारण मी पंतप्रधानांना भेटले आणि त्यामुळे माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला आहे.” मालवथ म्हणाली की आता ती अधिकाधिक मुलींना प्रोत्साहन देत आहे आणि तिच्या आवडीतून एक व्यवसाय बनवला आहे आणि आता ती तरुण खेळाडूंना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देत आहे आणि या साहस प्रकाराचा भारतभर विस्तार करत आहे.
दीपा मलिक ही भारतातील सर्वांसाठी प्रेरणा आहे आणि 2016 मध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली महिला पॅरा-अॅथलीट आहे. पंतप्रधानांनी मन की बातमध्ये विकलांग ऐवजी फक्त ‘दिव्यांग’ शब्द वापरून जनतेच्या मानसिकतेत झालेल्या बदलाचे महत्त्व अधोरेखित केले. याबाबदल ती म्हणाली, “पंतप्रधान मोदींना ‘चाय पे चर्चा’मध्ये भेटून मला आनंद झाला आणि पंतप्रधानांना आमच्या चर्चेतील प्रत्येक शब्द लक्षात असतो आणि आमची मन की बात त्यांनी ऐकली. व्यंगापेक्षा क्षमतांवर लक्ष केंद्रित करूया. मन की बातच्या माध्यमातून पंतप्रधानांनी सर्वांना ‘दिव्यांग’ हा शब्द वापरण्याचे आवाहन केले. तिने नमूद केले की, “जेव्हा पंतप्रधान काही बोलतात तेव्हा संपूर्ण देश ऐकतो आणि ते संपूर्ण देशात खोलवर बदल घडवून आणतात.” मलिक यांनी पंतप्रधानांच्या मन की बातची एक मिनिटाची क्लिप दाखवली, ज्यामध्ये पंतप्रधान म्हणाले की तिने पदक जिंकून तिच्या व्यंगावर मात केली आहे आणि हे इतके शक्तिशाली आहे, ते त्यांची इच्छाशक्ती आणि प्रतिभा दर्शवते. मलिक यांनी नमूद केले की मन की बातद्वारे आणि विशेषतः दिव्यांगांसाठी महिला सक्षमीकरणाला खूप प्रोत्साहन देण्यात आले आहे.
निखत जरीनने अधोरेखित केले की खेलो इंडियाने भारतातील खेळांमध्ये मोठा बदल घडवून आणला आहे, कारण आर्थिक सहाय्य खूप महत्वाचे आहे आणि खेलो इंडियाने सर्व खेळाडूंना आणि विशेषत: महिला खेळाडूंना हे सहाय्य दिले आहे ज्यांनी खेळात प्रगती केली आहे आणि विक्रम नोंदवले आहेत. ती म्हणाली, “महिला इतरांनाही कठोर परिश्रम करण्यास आणि मेहनतीने खेळण्यासाठी प्रेरित करतात.” TOP (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम) योजनेबद्दल बोलताना, ती म्हणाली, “सर्व खेळाडूंसाठी ही योजना खूप महत्वाची आहे आणि यातून आम्हाला मिळणारा पाठिंबा आम्हाला अधिक कठोर परिश्रम करण्यासाठी आणि देशासाठी अधिक पदके मिळवण्यासाठी प्रेरित करतो .”
रवीना टंडन यांनी देखील G20 अंतर्गत वुमन 20 कार्यगटाचा भाग असल्याबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की त्यांना आलेला अनुभव उत्कृष्ट आहे आणि धोरण तयार करण्यासाठी विचारमंथन आणि अजेंडा आखणी हा एक समृद्ध अनुभव आहे.त्या पुढे म्हणाल्या, “तळागाळाच्या स्तरावर महिलांना आर्थिक सक्षमीकरणाद्वारे प्रोत्साहन देण्याची गरज आहे. हा असा देश आहे जिथे नारी शक्तीला चंडी, काली दुर्गा सारख्या देवीप्रमाणे पुजले जात होते आणि आता आपल्याकडे पायलट, बँकर्स, टेक्नोक्रॅट, खेळाडू महिला आहेत आणि या आपल्या नारी शक्ती आहेत.” “पर्यावरण आणि जागतिक तापमानवाढ हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि पुनर्वापर आणि टिकाऊपणाच्या दिशेने महिला नेतृत्व करत आहेत आणि समाजाला पुढे घेऊन जाणाऱ्या महिलाच आहेत आणि त्यांनी हा प्रकाश शक्य तितका पसरवला पाहिजे कारण त्या कोणत्याही भूमिकेत खूप शक्तिशालीच आहेत “.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply