मुंबई, 24 एप्रिल (हिं.स.) : भारतीय रत्ने आणि आभूषणे उद्योगाने जगभरात आपली मोहोर उमटवली आहे. प्रतिकूल जागतिक आर्थिक वातावरणात देखील उत्तम प्रदर्शन केले, अशा शब्दात केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी प्रशंसा केली. मुंबईत 49व्या भारतीय रत्ने आणि आभूषणे पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारप्राप्त निर्यातदारांचा सत्कार रविवारी करण्यात आला. रत्ने आणि आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषदेद्वारे (GJEPC) दिल्या जाणाऱ्या ह्या पुरस्कारात, या क्षेत्रातील, प्रमुख निर्यातदारांच्या कार्याचा सन्मान केला जातो. कार्यक्रमात गोयल यांनी 28 प्रमुख निर्यातदार आणि सुविधा प्रदात्यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेल्जियमचे महावाणिज्य दूत, फ्रँक गीर्कन्स, GJEPC चे अध्यक्ष विपुल शहा, ईसीजीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सेंथिलनाथन, सिप्झचे विकास आयुक्त श्याम जगन्नाथन, पश्चिम विभागाचे अतिरिक्त महासंचालक आर.के. मिश्रा, जीजेईपीसीचे उपाध्यक्ष किरीट भन्साली, पीएमबीडी, जीजेईपीसीचे सह संयोजक निलेश कोठारी, कार्यकारी संचालक सब्यसाची रे, वरिष्ठ सरकारी अधिकारी, बँकिंग क्षेत्रातील अधिकारी, विविध संघटना आणि निर्यात प्रोत्साहन परिषदेचे पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते.
आपल्या प्रमुख भाषणात, पीयूष गोयल यांनी प्रथम ह्या पुरस्कार सोहळ्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जीजेईपीसीचे अभिनंदन केले. रत्ने आणि आभूषणे उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. सर्व पुरस्कार विजेते आणि पुरस्कारांसाठी इच्छुक निर्यातदार यापुढेही एकत्रित काम करतील आणि निकोप स्पर्धेची भावना कायम ठेवत, ह्या उद्योगक्षेत्रासाठी अभिमानास्पद कामगिरी करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. भारतीय रत्ने आणि आभूषणे उद्योगाने जगभरात आपली मोहोर उमटवली असून, प्रतिकूल जागतिक आर्थिक वातावरणात देखील उत्तम प्रदर्शन केल्याबद्दल त्यांनी या क्षेत्राची प्रशंसा केली. या क्षेत्रासह इतर सर्व क्षेत्रांच्या निर्यातीचा विकास सुनिश्चित करण्यात सिप्झ पार पाडत असलेल्या भूमिकेचीही त्यांनी दखल घेतली.
भारतीय रत्ने आणि आभूषणे उद्योगाविषयी बोलतांना गोयल म्हणाले की, आपल्या दागिन्यांचे डिझाईन्स, त्यातील सौन्दर्य आणि आधुनिकता तसेच परंपरा यांचा अचूक मेळ यांचे प्रतिबिंब आपल्या उत्पादनांमधे दिसत, असून भारताने या उद्योगात अत्यंत महत्वाचे स्थान मिळवले आहे, हेच ही उत्पादने सिद्ध करतात. भारतीय रत्ने आणि आभूषणे क्षेत्र, आपली यशोगाथा यापुढेही नेत, देशातील युवकांसाठी लक्षावधी रोजगार आणि संधी निर्माण करत राहील, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “देशात अधिकाधिक उद्योगपूरक वातावरण निर्माण होईल, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, जेणेकरून तुमच्यासारख्या सर्व उद्योगांना आपले व्यवसाय प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे करता येतील,” असे गोयल पुढे म्हणाले.
तीव्र स्पर्धेच्या या काळातही सहकार्य आणि मैत्रीची भावना रत्न आणि आभूषण उद्योगाचे वेगळेपण दर्शवणारी आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, 2047 पर्यंत, म्हणजेच स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षांपर्यंत भारताला एक विकसित आणि समृद्ध राष्ट्र म्हणून आपली ओळख निर्माण करण्यासाठी, सरकारला कसे बळ मिळत आहे, हे ही त्यांनी सांगितले.
जीजेईपीसीचे अध्यक्ष विपुल शाह यांनी भारतानं, 2022-23 या आर्थिक वर्षात भारताच्या व्यापारी आणि सेवा या दोन्हींच्या एकत्रित निर्यातीने 770 अब्ज डॉलर्सचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे अभिनंदन केले. संयुक्त अरब अमिरात आणि भारत यांच्यात झालेला सीईपीए करार, भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील ईसीटीए करार झाल्याबद्दल, शहा यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. इंग्लंड, कॅनडा आणि युरोपीय महासंघासोबत सध्या मुक्त व्यापार करारांविषयी वाटाघाटी सुरु असून, ही करार झाल्यास, निर्यातदारांना एक ट्रिलियन डॉलर्सच्या निर्यातीचा टप्पा गाठण्यास मदत होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
मुंबईत सिप्झ इथे सुमारे 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन उभारले जात असलेले, भव्य सामाईक सुविधा केंद्र (CFC), या उद्योगक्षेत्राला आधुनिक बनवण्याच्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या पाठबळाने, मध्यम आणि लघु उद्योगांना मदत करण्याच्या गोयल यांच्या दूरदृष्टीतूनच साकार होत आहे, असेही विपुल शहा यावेळी म्हणाले. “पीयूषजींची प्रत्यक्ष देखरेख आणि मार्गदर्शनाखाली उभारल्या जाणाऱ्या या केंद्राचे उद्घाटन या वर्षी सप्टेंबरमध्ये करण्याची योजना आहे. या केंद्राचे सगळे कामकाज परिषदेद्वारे चालवले जाईल. परिषदेनं यासाठी आधीच एक विशेष समिती आणि सचिवालय स्थापन असून केंद्राचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यासाठी, सचिवालय सिप्झ प्राधिकरणाशी समन्वय साधून आहे.” असेही ते म्हणाले. “नवी मुंबईत पहिले मेगा ज्वेलरी पार्क उभारण्यासाठी आपले मार्गदर्शन आम्हाला लाभावे, अशी आमची विनंती आहे. या पार्कमुळे, दागिन्यांच्या निर्यातीत तुर्की किंवा इटलीप्रमाणे भारतात आमूलाग्र परिवर्तन घडू शकेल.” अशी विनंती शहा यांनी केंद्रीय मंत्र्यांना केली.
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, रत्ने आणि आभूषणांची एकूण निर्यात 2.48% ने वाढून 300462.52 कोटी रुपये झाली होती. गेल्या वर्षी याच कालावधीत ही निर्यात 293193.19 कोटी रुपयांची झाली होती. अमेरिकन डॉलर्सच्या संदर्भात सांगायचे झाल्यास,रत्ने आणि आभूषणांची एकूण निर्यात 37468.66 दशलक्ष डॉलर्स इतकी होती जी गेल्या वर्षी याच कालावधीत 39331.71 दशलक्ष डॉलर्स इतकी होती.
बदलत्या उद्योगविश्वाशी ताळमेळ राखण्यासाठी, 49 व्या पुरस्कार निवडीत, ग्राहकांची कमाल संख्या, प्रयोगशाळेत स्वतः विकसित केलेले हीरे, तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोन्मेष, व्यवसायाचे नवे मॉडेल, सेवा क्षेत्र, पेटंट, डिजिटल, ई-कॉमर्स यासारख्या नवीन पुरस्कार श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे. व्यावसायिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कंपन्यांच्या कार्याची दखल घेण्यासोबतच, तसेच, ‘ब्रँड इंडिया’ला प्रोत्साहन देण्यासह, जीजेईपीसीने, यंदाची महिला उद्योजिका आणि या उद्योगांना वित्तपुरवठा करणाऱ्या बँकांचाही गौरव केला.
रत्ने आणि आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषदे (GJEPC) विषयी
भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 1966 रत्ने आणि आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषदेची स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर जेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करण्यास सुरुवात केली, तेव्हा देशाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या अनेक निर्यात प्रोत्साहन परिषदांपैकी ही एक आहे. 1998 पासून, जीजेईपीसीला स्वायत्त दर्जा देण्यात आला आहे. जीजेईपीसी ही रत्ने आणि आभूषण उद्योग क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे आणि आज या क्षेत्रातील 9000 उद्योजकांचे ती प्रतिनिधित्व करते. मुंबईत या संस्थेचे मुख्यालय असून, नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई, सुरत आणि जयपूर इथे प्रादेशिक केंद्रे आहेत. अशाप्रकारे या संस्थेचा अतिशय व्यापक आवाका असून आपल्या सदस्यांना थेट आणि अधिक अर्थपूर्ण पद्धतीने सेवा देण्यासाठी ही संस्था त्यांच्या सतत संपर्कात असते. गेल्या काही दशकांमध्ये, जीजेईपीसी सर्वात सक्रिय निर्यात प्रोत्साहन परिषदांपैकी एक म्हणून उदयास आली आहे. आणि आपल्या प्रोत्साहनपर उपक्रमातून या संस्थेने आपला विस्तार आणि खोली दोन्ही वाढवली आहे. तसेच, संस्थेच्या सदस्यांपर्यंत जास्तीत जास्त सेवा पोहोचवण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply