Home राजकारण 2047 पर्यंत विकसित देश होण्याचा भारताचा संकल्प डिजिटल प्रगती अधिक दृढ – अनुप्रिया पटेल

2047 पर्यंत विकसित देश होण्याचा भारताचा संकल्प डिजिटल प्रगती अधिक दृढ – अनुप्रिया पटेल

2047 पर्यंत विकसित देश होण्याचा भारताचा संकल्प डिजिटल प्रगती अधिक दृढ - अनुप्रिया पटेल

नवी दिल्ली, 27 मार्च (हिं.स.) : 2047 पर्यंत भारत 32 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स इतक्या जीडीपीसह विकसित देश बनेल, जो भारत आणि जागतिक समुदायासाठी एक निर्णायक क्षण असेल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केले. प्रगती मैदान येथे आज 23 व्या INDIASOFT चे उद्घाटन पटेल यांच्या हस्ते झाले. आयसीटी क्षेत्रात भारत करत असलेल्या प्रगतीचा या वाढीवर मोठा प्रभाव पडेल, असेही त्या म्हणाल्या.

“आतापासून 2047 पर्यंतचा काळ , याचा आपण अमृत काळ असा उल्लेख करतो, या काळात भारत प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करणार आहे… तेच आपले स्वप्न आहे, सामूहिक ध्येय आहे आणि आपल्या गौरवशाली इतिहासातील एक परिवर्तनात्मक टप्पा आहे”, असे नमूद करत त्या म्हणाल्या की , हे विकसित तंत्रज्ञान आणि उपकरणे अन्य देशांसोबत सामायिक करायची भारताची इच्छा आहे.

भारताच्या विकासाचा वाटचालीत सर्व देशांचा वाटा असेल कारण विकसित तंत्रज्ञान आणि संशोधन हे सार्वत्रिक प्रासंगिक असतील यावर त्यांनी भर दिला. या संदर्भात, त्यांनी नमूद केले की पुढील तीन दिवसात INDIASOFT मध्ये 70 हून अधिक नवीन उत्पादने सादर केली जाणार आहेत, जी भारतातील संशोधन आणि विकास क्षेत्रातील अत्यंत प्रतिभावान व्यावसायिकांच्या प्रयत्नातून विकसित झाली आहेत. “भारताने डिजिटल क्षेत्रात साधलेली प्रगती यातून प्रतिबिंबित होते आणि 2047 पर्यंत विकसित देश होण्याचा संकल्प अधिक दृढ होतो ,” असे त्या म्हणाल्या.

भारताची,व्यापारी माल आणि सेवा यांची निर्यात 2021-22 मधील 650 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 2022-23 पर्यंत 750 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, यावर पटेल यांनी भर दिला. भारताचे निर्यात लक्ष्य गाठण्यात सेवा निर्यातीचे विशेषत: माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा यांचे योगदान महत्त्वपूर्ण असेल.

2027 पर्यंत भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल आणि जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “आपल्या स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षी आपण एक विकसित राष्ट्र बनू”,याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय कार्यक्रमात 80 देशांतील 650 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत. इतर एकत्रित कार्यक्रमांसह या कार्यक्रमात 1500 हून अधिक भारतीय प्रदर्शक त्यांची उत्पादने आणि संशोधन प्रदर्शित करत आहेत.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.