रत्नागिरी, 22 मार्च, (हिं. स.) : जिल्ह्यातील वनक्षेत्रामध्ये वाढ करून संरक्षण करावे, अशी मागणी चिपळूण येथील जलदूत आणि वाशिष्ठी जगबुडी नदी प्रहरी सदस्य शाहनवाज शाह यांनी वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात प्रामुख्याने अत्यल्प वनक्षेत्र आहे. खासगी जंगलातून चाललेल्या अमर्याद वृक्षतोडीमुळे ऑक्सिजन निर्मितीवर परिणाम होत आहे. त्यामुळे भविष्यात जमिनीची धूप, भूस्खलन, अनियमित पर्जन्यवृष्टी, ढगफुटी आणि जैवविविधतेची हानी अशा अनेक गंभीर परिस्थितीला समोरे जावे लागणार आहे.
जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८२४८.२ चौ. कि.मी. असून यापैकी ९६.०२ चौ. कि.मी. म्हणजेच केवळ १.१२ टक्के हे वनक्षेत्र आहे. हे क्षेत्र किमान ३३ टक्के असणे आवश्यक आहे. याकरिता शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय होऊन ज्या दुर्गम डोंगराळ क्षेत्र आहे ते, तसेच काही ठिकाणी असणारे वृक्षासह जंगल शासनाने आरक्षित करून संबंधित जमीनमालकांना योग्य मोबदला द्यावा आणि ते जंगल टप्प्याटप्प्याने ताब्यात घ्यावे. तूर्त आरक्षित करून त्वरित मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply