Home मराठी बातम्या पर्यटन आणि मनोरंजन उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते निरंजन डावखरेंचा `कर्तव्यपथ’ अहवाल प्रकाशित

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते निरंजन डावखरेंचा `कर्तव्यपथ’ अहवाल प्रकाशित

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते निरंजन डावखरेंचा `कर्तव्यपथ' अहवाल प्रकाशित

ठाणे, 24 एप्रिल (हिं.स.) : कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेत प्रतिनिधीत्व करताना आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी पाच वर्षात केलेल्या कार्यावरील `कर्तव्यपथ’ अहवालाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अहवालाचे प्रकाशन करून आमदार निरंजन डावखरे यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या.

कोकण पदवीधर मतदारसंघात तलासरीपासून दोडामार्ग पर्यंतच्या ५५ तालुक्यांचा समावेश होतो. या विस्तीर्ण मतदारसंघात २०१८ ते २०२३ या काळात समाजाच्या विविध स्तरांत आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी कार्य केले. पदवीधर तरुण, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथालयातील कर्मचारी आदींबरोबरच शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणारे प्रश्न सातत्याने विधान परिषदेत मांडले. तसेच त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. कोकणातील शाळा डिजिटल करण्यासाठी साहित्याचे वाटप केले. नव्या शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठीही ते कार्यरत आहेत. पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याबरोबरच भाजपाचे ठाणे शहर अध्यक्षपद भूषविले. या काळात अनेक नागरी समस्या सोडविल्या. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या अन्यायकारक निर्णयांविरोधात सातत्याने आंदोलने केली. कोरोना आपत्तीच्या काळात भाजपाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुमारे पाच लाख नागरिकांना दिलासा दिला होता. गरजूंना अन्न व धान्याचे किट, औषधे, रुग्णांवर वेळीच उपचार, संशयित रुग्णांची वेळेत चाचणी, नागरिकांसाठी लस शिबीर आदी उपक्रम राबवून ठाणेकरांची मने जिंकली होती. कोकणातील सरकारी रुग्णालयांमध्ये व्हेंटीलेटर, कोविड तपासणी लॅब, संसर्ग तपासणी किट आदींसाठीही त्यांनी निधी उपलब्ध केला होता. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुराच्यावेळीही त्यांनी मदतकार्य राबविले होते. या कार्याचा सविस्तर अहवाल `कर्तव्यपथ’मध्ये मांडण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या अहवाल प्रकाशनाच्या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रविण दरेकर, आमदार गीता जैन, आमदार पराग अळवणी, माजी मंत्री कृपाशंकर सिंह आदींची उपस्थिती होती.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.