Home मराठी बातम्या पर्यटन आणि मनोरंजन सर्व विज्ञान मंत्रालये, विभाग गुरुवारी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन संयुक्तपणे साजरा करणार

सर्व विज्ञान मंत्रालये, विभाग गुरुवारी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन संयुक्तपणे साजरा करणार

सर्व विज्ञान मंत्रालये, विभाग गुरुवारी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन संयुक्तपणे साजरा करणार

नवी दिल्ली, 8 मे (हिं.स.) : केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान डॉ जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान आणि तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, सीएसआयआर, पृथ्वी विज्ञान, अंतराळ आणि अणुऊर्जा यासह विज्ञान मंत्रालये तसेच विभागांची उच्चस्तरीय संयुक्त बैठक झाली. सर्व विज्ञान मंत्रालये आणि विभाग 11 मे रोजी संयुक्तपणे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा करतील, असे सिंह यावेळी म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, भारतात 11 मे रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आपल्या देशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज, संशोधक आणि अभियंते यांच्या कामगिरीवर भर देणारा आहे. यावर्षी, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाची संकल्पना “अटल टिंकरिंग लॅब्स” आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2016 मध्ये याची सुरुवात झाली. तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी शालेय आणि अध्यापन संस्थाच्या स्तरावर नवोन्मेषपूर्ण स्टार्टअप्स आणि उद्योजकता तयार करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी हाती घेतलेला हा एक पथदर्शक उपक्रम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या ऐतिहासिक सुधारणांमुळे भारताने गेल्या 9 वर्षात तंत्रज्ञान क्षेत्रात लक्षवेधी प्रगती पाहिली आहे, यावर सिंह यांनी भर दिला. विकासाला चालना देणाऱ्या शास्त्रज्ञ आणि अभियंते यांच्या कामगिरीची नोंद घेत त्यांचे ऋण व्यक्त करण्याकरिता राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन हा एक उत्तम दिवस असल्याचे ते म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की सायन्स मीडिया कम्युनिकेशन सेल (एसएमसीसी) अस्तित्वात आल्यानंतर, भारताच्या वैज्ञानिक कामगिरीबद्दल सर्व संबंधितांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्व विभागांच्या विकासगाथा संकलित करायला हव्यात. त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायला हव्यात.

या बैठकीला भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, प्रा. अजय कुमार सूद तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, सीएसआयआर, पृथ्वी विज्ञान, अवकाश आणि अणुऊर्जा यासह विज्ञान मंत्रालये आणि विभागांचे सचिव उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.