Home मराठी बातम्या आंदोलने चंद्रपूर : शिक्षक भरतीसाठी आंदोलन करणार – आ. प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर : शिक्षक भरतीसाठी आंदोलन करणार – आ. प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर : शिक्षक भरतीसाठी आंदोलन करणार - आ. प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर 15 मे (हिं.स.) : शिक्षक भरती तात्काळ करा अशी मागणी करीत अन्यथा भावी शिक्षकांसोबत आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम शिक्षकांच्या हातात असते. परंतु राज्यात अनेक ठिकाणी शिक्षकांची पदे रिक्त असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याचे चित्र आहे. ते बदलविण्याकरिता अनेकदा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शिक्षक भरती घेण्याची मागणी सभागृहात केली होती. त्यानंतर शासनाकडून त्रयस्थ संस्थेकडून २४ फेब्रुरवारी ते ३ मार्च या कालावधीत TAIT परीक्षा घेण्यात आली. यामध्ये दोन लाखाहून अधिक भावी शिक्षकांनी परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल २४ मार्च रोजी लागला. परंतु, अद्याप पवित्र पोर्टलवर जाहिरात आली नसल्याने भावी शिक्षकांत नैराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. एक महिन्यात शैक्षणिक सत्र सुरु होणार असून देखील पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नसल्याने सदर भरती तात्काळ करावी अन्यथा भावी शिक्षकांना घेऊन सरकार विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या इशारा आ. धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राच्या माध्यमातून दिला आहे.

राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया नवीन सत्र सुरु होण्या आधी करण्याचे आश्वासन सभागृहात दिले होते. परंतु सदर आश्वासन हवेत विरणार काय ? असा प्रश्न उमेदवारांना निर्माण झाला आहे.

तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख आहे. परंतु शिक्षण धोरण तरुणांचे भविष्य बिघडविणारे ठरता कामा नये, कारण नवीन शैक्षणिक सत्र सुरु होण्याकरिता महिनाभराचा कालावधी शिल्लक असतांना सरकार मात्र, तात्काळ शिक्षक भरती घेण्यासाठी उदासीन असल्याचे दिसून येत आहे. त्यासोबतच अनेक शाळेत गणित, इंग्रजी व विज्ञान विषय शिक्षक नाही. त्यामुळे हे विषय कसे शिकायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे पडला आहे. हि बाब अतिशय गंभीर आहे. राज्यात २ लक्ष भावी शिक्षकांनी दिलेल्या परीक्षेतील गुण लक्षात घेतून तात्काळ पवित्र पोर्टल वर जाहिरात प्रसिद्ध करून नियमाप्रमाणे ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया तात्काळ घेण्याची लोकहितकारी मागणी . धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.