Home मराठी बातम्या राजकीय चर्चा आणि प्रतिक्रिया काँग्रेसच्या ‘डीनर-पार्टी’वर ठाकरे गटाचा बहिष्कार

काँग्रेसच्या ‘डीनर-पार्टी’वर ठाकरे गटाचा बहिष्कार

काँग्रेसच्या 'डीनर-पार्टी'वर ठाकरे गटाचा बहिष्कार

नवी दिल्ली, 27 मार्च (हिं.स.) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या सावरकरांच्या अपमानावरून उद्धव ठाकरे गट प्रचंड नाराज झालाय. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे रविवारी झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी नाराजी जाहीर केल्यानंतर आता सोमवारी दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या ‘डीनर-पार्टी’वर ठाकरे गटाने बहिष्कार टाकलाय.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या लंडन दौऱ्यात देशविरोधी वक्तव्य केल्यामुळे त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपने लावून धरली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले होते की, “माफी मागायला मी काही सावरकर नव्हे गांधी आहे” राहुल यांचे हे विधान सावरकर अनुयायांसह उद्धव ठाकरे गटाला देखील झोंबले आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी काँग्रेसच्या स्नेह-भोजनावर बहिष्कार टाकला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनंही यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या डिनर पार्टीवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी (27 मार्च) संध्याकाळी सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांसाठी त्यांच्या घरी जेवण ठेवले असून आपल्या पक्षाचा एकही नेता डिनरला उपस्थित राहणार नसल्याचे खा. संजय राऊत यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरेंनी याबाबत टीका केल्यानंतर खा.संजय राऊत यांनीही राहुल गांधींचा समाचार घेतला. ‘वीर सावरकर आमच्या आणि देशासाठी श्रद्धेचा विषय आहे. अंदमानात 14 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा सोपी नाही. अशा टीकेला महाराष्ट्रातील जनता चोख प्रत्युत्तर देऊ शकते. आम्ही तुमच्या सोबत आहोत पण वीर सावरकर हे आमचे प्रेरणास्थान असल्याचे राऊत यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.