Home मराठी बातम्या राजकीय चर्चा आणि प्रतिक्रिया देशाच्या सक्षम आणि तरुण मनुष्यबळाची योग्यरित्या जोपासना करावी – राजनाथ सिंह

देशाच्या सक्षम आणि तरुण मनुष्यबळाची योग्यरित्या जोपासना करावी – राजनाथ सिंह

देशाच्या सक्षम आणि तरुण मनुष्यबळाची योग्यरित्या जोपासना करावी - राजनाथ सिंह

नवी दिल्ली, 22 एप्रिल (हिं.स.) : देशाला बळकट आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी देशाच्या सक्षम आणि तरुण मनुष्यबळाची योग्यरित्या जोपासना केली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. आयुर्विज्ञान अकादमीच्या 63 व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात ते आभासी माध्यमातून बोलत होते. लोकसंख्या शास्त्रीय लाभांशाचे फायदे सुनिश्चित करण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पैलूंसह सर्वसमावेशक आरोग्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.

कोणत्याही राष्ट्राच्या विकासात आरोग्य हा महत्त्वाचा घटक असल्याचे अधोरेखित करत जेव्हा देशातील नागरिक निरोगी असतील, तेव्हाच देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. निरोगी लोक देशाच्या प्रगतीसाठी चांगल्या पद्धतीने काम करू शकतील आणि म्हणूनच आपल्या देशासाठी आरोग्य क्षेत्र महत्त्वाचे आहे.त्यामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांना आदराचे स्थान आहे, असे त्यांनी सांगितले.

सर्वांसाठी आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांबद्दल सांगत, सार्वजनिक आरोग्याशी संबंधित समस्यांच्या संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी वैद्यकीय जगताला केले.

संरक्षण मंत्र्यांनी यावेळी सामाजिक कल्याणाचे महत्त्व अधोरेखित केले याकडे शारीरिक आणि मानसिक आरोग्याव्यतिरिक्त आरोग्याचा तिसरा पैलू म्हणून पाहायला हवे असे ते म्हणाले. कामाच्या शोधात लोक त्यांच्या मूळ गावातून शहराकडे आणि इतर ठिकाणी जात असल्याने सामाजिक कल्याणासमोर आव्हाने आहेत, स्थलांतरीत झालेले लोक त्यांच्या मुळांपासून तुटतात , त्यांना एकटेपणा आणि असुरक्षित वाटते याचा त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो.या व्यतिरिक्त, एकल पालकत्वामध्येही वाढ होण्यासह विभक्त कुटुंब आणि उप विभक्त कुटुंबही अधिक ठळकपणे दिसू लागली आहेत , याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

अशाप्रकारच्या घडामोडींवर नियंत्रण न ठेवल्यास विवाह संस्था धोक्यात येऊ शकते आणि एकल व्यक्ती कुटुंबे सामान्य होऊ शकतात. हा निवड स्वातंत्र्याचा विषय जरी दिसत असला तरी प्रत्यक्षात हे एक मोठे सामाजिक संकट आहे, जे मानवाला एकाकीपणाकडे ढकलत असून ते टाळणे आवश्यक आहे, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.