Home मराठी बातम्या राजकीय चर्चा आणि प्रतिक्रिया पीयूष गोयल भूषवणार भारत-युरोपीय संघ टीटीसी मंत्रिस्तरीय बैठकीचे सहअध्यक्षपद

पीयूष गोयल भूषवणार भारत-युरोपीय संघ टीटीसी मंत्रिस्तरीय बैठकीचे सहअध्यक्षपद

पीयूष गोयल भूषवणार भारत-युरोपीय संघ टीटीसी मंत्रिस्तरीय बैठकीचे सहअध्यक्षपद

नवी दिल्ली, 14 मे (हिं.स.) : भारत-युरोपीय संघ व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या (टीटीसी) पहिल्या मंत्रीस्तरीय बैठकीचे ब्रसेल्समध्ये 16 मे रोजी आयोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय वाणीज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, परराष्ट्र व्यवहार मंत्री तसेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्र्यांसोबत या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवणार आहेत. युरोपीय संघाकडून कार्यकारी उपाध्यक्ष (EVP) डोम्ब्रोव्स्कीस व वेस्टेगर बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवतील. व्यापार, विश्वासार्ह तंत्रज्ञान आणि सुरक्षा यांच्या संदर्भातील धोरणात्मक आव्हानांना तोंड देण्यासाठी एका उच्च स्तरीय समन्वय मंचाची स्थापना करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेर यांनी या टीटीसीची घोषणा नवी दिल्ली येथे एप्रिल 2022 मध्ये केली होती.

15 मे रोजी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल युरोपीय संघाचे कार्यकारी उपाध्यक्ष (EVP) डोम्ब्रोव्स्कीस यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर युरोपीय संघ आणि भारत या दोघांच्या व्यापार क्षेत्रातील अग्रणींच्या उपस्थितीत कार्यगट-3 च्या हितधारकांसोबत चर्चा करण्यात येईल. व्यापार, तंत्रज्ञान आणि प्रतिरोधक चिवट पुरवठा साखळी या विषयांवर या बैठकीत भर दिला जाईलयामध्ये युरोपीय संघ आणि भारत यांच्या व्यापार क्षेत्रातील 6 नेते सहभागी होतील. दुपारी बेल्जियममधील उद्योग महासंघाने(FEB) आयोजित केलेल्या व्यापारविषयक कार्यक्रमात ते सहभागी होतील आणि मुख्य भाषण करतील. या बैठकीमध्ये भारतात गुंतवणुकीच्या पुढील योजनांसह बेल्जियमच्या उद्योगांचा भारतातील आर्थिक सहभाग या विषयावर चर्चा करण्यात येईल. त्याशिवाय तिन्ही भारतीय मंत्री बेल्जियमचे पंतप्रधान आणि युरोपीय आयोगाचे अध्यक्ष यांची देखील भेट घेतील.

16 मे रोजी पीयूष गोयल कार्यगट एक आणि दोनच्या हितधारकांच्या कार्यक्रमात सहभागी होतील. कार्यगट एकचा भर डिजिटल गव्हर्नन्स आणि कनेक्टिव्हिटीवर आहे तर, कार्यगट दोन स्वच्छ आणि हरित ऊर्जा तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. या कार्यक्रमात देखील दोन्ही बाजूंच्या आठ व्यापारी नेत्यांचा सहभाग असेल जे आपले अभिप्राय/ सूचना यामध्ये मांडतील. या कार्यक्रमात गोयल विशेष मार्गदर्शन करतील. या बैठकीत देखील परराष्ट्रमंत्री आणि ईव्हीपी वेस्टेगर सहभागी होतील.

यानंतर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल युरोपीय आयुक्त थियरी ब्रेटन यांच्यासोबत अंतर्गत व्यापारासंदर्भात, द्विपक्षीय चर्चा करतील, ज्यामध्ये एसएमई क्षेत्राशी संबंधित मुद्दे, स्टार्टअप परिसंस्था आणि ई-कॉमर्सवर विचारविनिमय होईल.

यानंतर भारत-युरोपीय संघ व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या (टीटीसी) पहिल्या मंत्रिस्तरीय बैठकीचे आयोजन होईल, ज्यामध्ये परराष्ट्र व्यवहारमंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सहभागी होतील.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.