Home मराठी बातम्या राजकीय चर्चा आणि प्रतिक्रिया राहुल गांधींनी एक दिवस कोठडीत राहुन दाखवावे- फडणवीस

राहुल गांधींनी एक दिवस कोठडीत राहुन दाखवावे- फडणवीस

राहुल गांधींनी एक दिवस कोठडीत राहुन दाखवावे- फडणवीस

नागपूर, 04 एप्रिल (हिं.स.) : अंदमानात सावरकर राहिले त्या कोठडीत एसी लावून देतो, राहुल गांधींनी फक्त एक दिवस त्या कोठडीत राहून दाखवावे असे थेट आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. स्थानिक शंकर नगर चौकात सावरकरांच्या पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी फडणवीस म्हणाले की, ज्यांना या देशाचा इतिहास आणि वर्तमान माहिती नाही, ज्यांना स्वत:ला आणि त्यांच्या पक्षालाही भविष्य राहिलेले नाही असे लोक सावरकरांवर टीका करतात तेव्हा आश्चर्य वाटते. अंदमानच्या कोठडीत एसी लावून देतो राहुल गांधींनी एक दिवस त्याठिकाणी राहुल दाखवावे. राहुल गांधीनी ज्यांच्यासोबत जायचे असेल त्यांच्यासोबत जावे. पण, आम्ही हिंदूत्त्व सोडणार नाही. तुम्ही जेव्हा-जेव्हा वीर सावरकरांचा अपमान कराल, तेव्हा तेव्हा जनता अशीच रस्त्यावर उतरेल आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल असा इशारा फडणवीसांनी दिला. तुम्ही म्हणता, मी सावरकर नाही. पण, तुम्ही सावरकर नाही आणि तुम्ही गांधीही नाही. आणि सावरकर तुम्ही होऊ शकत नाही असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.इंग्लंडच्या राणीची मर्जी होईल, तेव्हा स्वातंत्र्य मिळेल, अशी धारणा होती. स्वातंत्र्य आम्हाला भीकेत नको होते. त्यामुळे सशस्त्र क्रांती झाली. वीर सावरकर यांनी 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामावर पुस्तक लिहिले. त्याने लाखो क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात 1857 ची क्रांती हाच पहिला लढा होता हे सावरकरांमुळे माहिती झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी सावरकरांचे मोठेपण महात्मा गांधी यांना समजले. पण, आजच्या गांधींना समजत नाही अशी खरपूस टीका केली. सावरकर हे चतुर, साहसी व देशभक्त आहेत. ब्रिटिशांचा कुटीलपणा सावरकरांनी माझ्या आधी ओळखला होता असे महात्मा गांधींनी सांगितले होते. पण आजच्या गांधींना हे समजत नाही हे आश्चर्य आहे असे ते म्हणाले.एकाच व्यक्तीला दोन जन्मठेप झाल्या, असे वीर सावरकर एकमात्र आहेत. त्या शिक्षा झाल्या, तेव्हा इतके वर्ष तुमचे सरकार तरी चालणार आहे का, असे इंग्रजांना विचारण्याचीही हिंमत वीर सावरकरांनी दाखविली होती, असे त्रिवेदी यांनी सांगितले. याप्रसंगी नागपुरातील सहाही विधानसभा क्षेत्रातून स्वातंत्र्यवीर गौरव यात्रा काढण्यात आल्या. या सर्व यात्रा सायंकाळी 7 वाजता शंकर नगर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन सभेत रूपांतर झाले. स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रेच्या समारोप प्रसंगी राजे मुधोजी भोसले, राष्ट्र सेविका समिती प्रमुख शांताक्का, खासदार कृपाल तुमाने आदी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.