Home मराठी बातम्या राजकारण ग्राहकांसाठी गुणवत्तेपेक्षा अन्य कोणतीही गोष्ट महत्त्वाची असू शकत नाही – पियुष गोयल

ग्राहकांसाठी गुणवत्तेपेक्षा अन्य कोणतीही गोष्ट महत्त्वाची असू शकत नाही – पियुष गोयल

ग्राहकांसाठी गुणवत्तेपेक्षा अन्य कोणतीही गोष्ट महत्त्वाची असू शकत नाही - पियुष गोयल

नवी दिल्ली, २५ मे (हिं.स.) : गुणवत्ता हीच आजच्या ग्राहकांची मागणी असून, ग्राहकांसाठी गुणवत्तेपेक्षा अन्य कोणतीही गोष्ट महत्त्वाची असू शकत नाही, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. ते बुधवारी नवी दिल्ली येथे 44 व्या आयएसओ कोपोल्को (ISO COPOLCO), अर्थात आंतरराष्ट्रीय मानक संघटनेच्या ग्राहक धोरण समितीच्या वार्षिक बैठकीच्या उद्घाटनपर सत्रात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करून, भारत एक देश म्हणून आपल्या भविष्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडू शकतो.

पीयूष गोयल म्हणाले की ग्राहक हक्क, सुरक्षितता आणि समाधान या सर्व गोष्टी गुणवत्तेवर अवलंबून आहेत आणि आजच्या मोठ्या प्रमाणात जागतिकीकरण झालेल्या आणि तंत्रज्ञानाचे सहाय्य असलेल्या जगात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ते म्हणाले की, उच्च दर्जाच्या वस्तू आणि सेवा मिळणे ही ग्राहकांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ग्राहकांची ही मूळ गरज पूर्ण केल्यावरच त्याला समाधानी करता येते.

ते म्हणाले की ग्राहक संरक्षण हा प्रशासनाचा अविभाज्य भाग आहे. अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक महत्त्वाची भूमिका बजावतो आणि सरकारने ग्राहकाच्या समृद्धीकडे तसेच ग्राहक संरक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत असल्याचे त्यांनी सांगितले आणि म्हणूनच उत्तरदायी प्रशासन निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, ग्राहक संरक्षणासाठी धोरणे बनवताना किफायतशीरपणा, व्यवहार्यता, आणि पूरकता हे मुद्दे देखील महत्त्वाचे आहेत. भारतातील प्रत्येक रहिवासी हा ग्राहक आहे, म्हणून ग्राहक व्यवहार विभागाला खूप महत्त्व आहे याबद्दल त्यांनी आपला ठाम विश्वास व्यक्त केला, आणि ते म्हणाले की, भारताने नवी शिखरे गाठावी, यासाठी ग्राहक व्यवहार विभाग आणि भारतीय मानक संस्था महत्वाची भूमिका बजावू शकतील.

केंद्रीय मंत्री म्हणाले की सरकार गुंतवणुकीला आकर्षित करण्यावर, आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवण्यावर आणि भारताला जागतिक पातळीवर महत्वाच्या स्थानावर नेण्यावर भर देत आहे. सरकारच्या गेल्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात प्रशासनाचा दर्जा हा महत्वाचा पैलू राहिल्याचे ते म्हणाले. भारताची व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धी आणि जास्तीतजास्त गुंतवणूक आकर्षित करण्याची क्षमता, याच्या केंद्रस्थानी ‘आनंदी आणि समाधानी ग्राहक’ असल्याचे गोयल यांनी अधोरेखित केले.

गुणवत्ता आणि ग्राहक हे बाजारपेठेचे स्वरूप निश्चित करण्यामध्ये आणि आर्थिक विकासाला चालना देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतील असे गोयल म्हणाले.

भारत आज जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, आणि येत्या काही वर्षांमध्ये तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे असे ते म्हणाले. मोठ्या प्रमाणातील प्रतिभेचा संचय आणि कौशल्य हे भारताचे सामर्थ्य आहे, यावर गोयल यांनी भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हे एक ‘उज्ज्वल स्थान’ असून जगभरातील नेत्यांनी आणि बहुपक्षीय संस्थांनी त्याला मान्यता दिली आहे, आणि जवळजवळ प्रत्येक विकसित देश भारताबरोबर व्यापार करण्यासाठी उत्सुक आहे, असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.