Home मराठी बातम्या राजकारण ठाकरे हे सत्तेसाठी काँग्रेस – राष्ट्रवादीचे मिंधे झालेत – प्रा. जोगेंद्र कवाडे

ठाकरे हे सत्तेसाठी काँग्रेस – राष्ट्रवादीचे मिंधे झालेत – प्रा. जोगेंद्र कवाडे

ठाकरे हे सत्तेसाठी काँग्रेस - राष्ट्रवादीचे मिंधे झालेत - प्रा. जोगेंद्र कवाडे

ठाणे, 19 मार्च, (हिं.स.) आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचा उल्लेख मिंधे सरकार असा करीत आहेत. पण, गेली अडीच वर्षे ठाकरे पिता-पुत्र सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिंधे झाले होते, अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. जोगेंद्र कवाडे यांनी केली. दरम्यान, ठाण्यातील गटई कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून ते सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये पीआरपीचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संत रविदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘शिवशक्ती-भीमशक्ती’ मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रा. कवाडे हे बोलत होते. या प्रसंगी मंचावर जयदीप कवाडे, लिलाबाई आशान, प्रमोद टाले, रमाकांत पाटील आदी उपस्थित होते.

प्रा. कवाडे पुढे म्हणाले की, राजाभाऊ चव्हाण यांनी भारतीय समाजाचा मेळावा आयोजित केला आहे. त्यांचे कौतूकच केले पाहिजे. संघर्ष करणार्या नेतृत्वाच्या मागे आपण उभे राहिलेच पाहिजे. बाबासाहेबांचे संत रविदास यांच्यावर प्रचंड प्रेम होते. त्यामुळेच बाबासाहेबांनी आपला एक ग्रंथ संत रविदासांना अर्पण केले आहे. आजचा कार्यक्रम हा स्वागत महोत्सव नाही तर हा वैचारिक महोत्सव आहे. बाबासाहेबांनी शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा हे फक्त दलितांना सांगितले नाही. तर, सबंध भारतीयांना त्यांनी हा संदेश दिलेला आहे. शोषितांनी संघर्ष करावा, ही शिकवण संत रविदास, छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. मागून जे मिळत नाही; ते खेचून घेण्याची हिमंत ठेवा, असेही महापुरुषांनी सांगितले आहे. हाच वारसा घेऊन गोरगरीबांनी लढण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी झाले पाहिजे.

सध्याच्या राजकारणावर प्रा. कवाडे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे आदित्य ठाकरे यांच्यासारखे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत. त्यांनी प्रचंड संघर्ष केला आहे. आपणही तसाच संघर्ष केला आहे. त्यामुळेच आम्हा दोघांमध्ये एकवाक्यता आहे. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे हे सत्ता गेल्याने वैफल्यग्रस्त झाले आहेत. म्हणून ते चुकीचे आरोप करीत आहेत. परंतु, आजचे सरकार हे दलित, आदिवासी, गोरगरीब लोकांचे सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून आपण गटई कामगारांच्या समस्यांचा पाठपुरावा करु, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.