Home मराठी बातम्या राजकारण छ. संभाजीनगर: कचरा वेचणाऱ्यांना देणार प्रशिक्षण

छ. संभाजीनगर: कचरा वेचणाऱ्यांना देणार प्रशिक्षण

छ. संभाजीनगर: कचरा वेचणाऱ्यांना देणार प्रशिक्षण

छत्रपती संभाजीनगर, 16 मे (हिं.स.) : महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी पदभार घेतल्यापासून शहरात नवनवीन संकल्पना राबविण्यास सुरूवात केली आहे. कचरा संकलनासाठी महापालिकेच्या घंटागाड्या घरोघरी जात असल्या तरी अनेकांना घटांगाड्यांची वेळ सोयीची नसते. अशा वेळी नागरिकांनी कॉल केल्यास त्यांच्या घरी जाऊन दुचाकीवरून कचरा संकलन करण्याची सुविधा असावी. त्यासाठी कचरा वेचकाला प्रशिक्षण द्यावे. नागरिकांकडून पैसे घेऊन ही सुविधा देता येऊ शकते, त्यानुसार तयारी करण्याचे आदेश जी. श्रीकांत यांनी मंगळवारी दि.16 मे रोजी घनकचरा विभागाला दिले.

छत्रपती संभाजीनगर पालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी मंगळवारी पडेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी उपायुक्त तथा घनकचरा विभागाचे प्रमुख सोमनाथ जाधव यांच्यासह कर्मचार्यांची बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, कचरा प्रक्रिया प्रकल्पात कचरा वेगळा करण्यासाठीची यंत्रणा तातडीने सुरू करावी. पालिकेच्या घंटागाड्या शहराच्या प्रत्येक भागात जाऊन कचरा संकलन करतात, पण काही नागरिकांना विशेषतः नोकरदारांना घंटागाडीची वेळ सोयीची नसते. अशावेळी अन्य यंत्रणा असणे गरजेचे आहे. कचरा वेचकाला प्रशिक्षण देण्यात यावे, जेणेकरून तो कॉल आलेल्या घरी जाऊन कचरा घेईल. त्यासाठी शुल्क आकारण्यात यावे. कचरा संकलित केल्यानंतर कचरावेचक त्या भागातील कचरा संकलन केंद्रावर नेऊन कचरा टाकेल, असे जी. श्रीकांत म्हणाले.

शहरात फिरणाऱ्या घंटागाड्या आपल्या भागात आल्याचे नागरिकांना घंटागाड्यांवर लावलेल्या गाण्यांवरून समजते. घंटागाड्यांवरील कर्मचारी शिट्टी वाजवतात. ही पद्धत बंद करून नागरिकांसाठी ऍप तयार करावे. या ऍपवरून नागरिकांना आपल्या भागात येणारी घंटागाडी कुठे आहे, ती कधीपर्यंत येईल, याची माहिती मिळेल. 50 मिटरवर घंटागाडी आल्यास नागरिकांना अलर्ट मेसेज मिळेल, अशी सुविधा ऍपमध्ये असावी, असेही जी. श्रीकांत यांनी बैठकीत सांगितले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.