Home मराठी बातम्या राजकारण काँग्रेस नेते, प. महाराष्ट्र देवस्थानचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे यांचे निधन

काँग्रेस नेते, प. महाराष्ट्र देवस्थानचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे यांचे निधन

काँग्रेस नेते, प. महाराष्ट्र देवस्थानचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे यांचे निधन

कोल्हापूर, ८ एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष ॲड. गुलाबराव घोरपडे यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. ते कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही होते. आज (शनिवारी) दुपारनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा विनायक व तीन मुली असा परिवार आहे.

काँग्रेस पक्षाचे त्यांनी दीर्घकाळ काम केले. काँग्रेसच्या राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील अनेक नेत्यांशी त्यांचे संबंध होते. विशेषतः माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी होते. अलीकडे ते जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्यासमवेत काम करत होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्ष पदावर कार्यरत असताना अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले होते. राज्यात महाविकास आघाडीचे शासन आल्यानंतर पुन्हा एकदा अध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली होती.

मागील महिन्यात राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्याविरुद्ध कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा, पापाची तिकटी येथे झालेल्या सत्याग्रह आंदोलनात ते सहभागी झाले होते.

घोरपडे हे मूळ माद्याळ (ता. कागल) येथील होते. मात्र सध्या महावीर महाविद्यालय परिसरात राहत होते. बी.कॉम., एल.एल.बी. पदवी घेतलेल्या घोरपडे यांनी काही काळ वकिलीही केली. नुकतीच त्यांची काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाली होती. मनमिळाऊ आणि नेहमी कामात व्यस्त असणाऱ्या घोरपडे यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कार्यकर्त्यांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

भूषवलेली पदे : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य, काँग्रेसच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निरीक्षक.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.