Home मराठी बातम्या राजकारण राहुल गांधी आज सूरत कोर्टात याचिका दाखल करणार

राहुल गांधी आज सूरत कोर्टात याचिका दाखल करणार

राहुल गांधी आज सूरत कोर्टात याचिका दाखल करणार

नवी दिल्ली, 03 एप्रिल (हिं.स.) : काँग्रेस नेते राहुल गांधी आज, सोमवारी सूरत न्यायदंडाधिकारी कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला आव्हान देणार आहेत. राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने अवमानना प्रकरणी 2 वर्षांची शिक्षा ठोठावली असून त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आलीय. या निर्णयाला राहुल गांधी सत्र न्यायालयात आव्हान देणार आहेत. त्यासाठी काँग्रेसच्या कायदेशीर सल्लागारांच्या टीमने याचिका तयार केलीय.

राहुल गांधींतर्फे याचिका दाखल करणारे ऍड्. किरीट पानवाला यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी 3 वाजता राहुल गांधींतर्फे सत्र न्यायालयात शिक्षेला आव्हान दिले जाणार आहे. राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान कर्नाटकातील कोलार इथल्या सभेत ललित आणि निरव मोदींच्या प्रकरणाचा हवाला देत “सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे..” असे विधान केले होते. त्यानंतर भाजप नेते पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्या विधानावर हरकत घेत सूरतच्या न्यायदंडाधिकारी कोर्टात अवमानना याचिका दाखल केली होती. याप्रकरणी 23 मार्च 2023 रोजी सूरतचे मुख्य न्यायदंडाधिकारी एच.एच. वर्मा यांच्या कोर्टाने राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली. राहुल गांधींना 2 वर्षाची शिक्षा झाल्यामुळे लोकसभा समितीने नियमानुसार त्यांची खासदारकी रद्द करून त्यांना शासकिय निवास रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर संपूर्ण काँग्रेस पक्ष एकत्र आला आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि सुप्रीम कोर्टातील वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या पुढाकाराने आणि फौजदारी प्रकरणातील तज्ज्ञ ऍड. आर.एस. चिमा यांनी स्वतः संपूर्ण याचिका बनवून घेतली आहे. याचिकेद्वारे काँग्रेस राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती सोबतच कायदेशीर त्रुटींवर प्रकाश टाकत हा खटलाच रद्द करण्याची मागणी करणार आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.