Home मराठी बातम्या कायदा आणि सुव्यवस्था ठाणे जिल्ह्यातील 6 हजार 435 धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला 10 कोटींचा बोनस

ठाणे जिल्ह्यातील 6 हजार 435 धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला 10 कोटींचा बोनस

ठाणे जिल्ह्यातील 6 हजार 435 धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला 10 कोटींचा बोनस

ठाणे, 6 एप्रिल (हिं.स.) ई पीक अँपवर पीक पेऱ्याची नोंद केलेल्या जिल्ह्यातील 6 हजार 435 धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 कोटी 29 लाख 6 हजार 195 रुपये एवढा बोनस जमा करण्यात आला असून उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच बोनसची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून राज्य शासनाने हेक्टरी 15 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार प्रति शेतकरी दोन हेक्टरपर्यंत ही बोनसची रक्कम देण्यात येणार होती. त्यासाठी ई पीक अँपवर पिक पेऱ्याची नोंदणी केलेले जिल्ह्यातील 7 हजार 319 शेतकरी बोनससाठी पात्र ठरले होते. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुमारे 11 कोटी 49 लाख 76 हजार 050 रुपये एवढी बोनसची रक्कम जिल्हा पणन महामंडळाकडे जमा झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत 6 हजार 435 शेतकऱ्यांना 10 कोटी 29 लाख 6 हजार 195 रुपये एवढी रक्कम अदा करण्यात आली आहे. यासाठी ई पिक अँपवर पिक पेऱ्याची नोंदणी करणे अनिवार्य होते. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जिल्हा पणन महासंघाच्या माध्यमातून ही रक्कम जमा करण्यात आली.

खरीप हंगामात जिल्हा पणन महासंघाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या 6 हजार 289 शेतकऱ्यांपैकी 4 हजार 475 शेतकऱ्यांना धानाची रक्कम अदा करण्यात आली आहे. आधारभूत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 5 संस्थांच्या माध्यमातून धानाची खरेदी करण्यात येते. या संस्थांच्या माध्यमातून आतापर्यंत 2 लाख 193.39 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. त्यातील 4 हजार 286 शेतकऱ्यांना आतापर्यंत 27 कोटी 38 लाख 69 हजार 796 रुपये एवढी रक्कम अदा करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना धान खरेदीची रक्कम तसेच प्रोत्साहनपर बोनसची रक्कम लवकरच बँक खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी यांनी दिली आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.