Home मराठी बातम्या पायाभूत सुविधा आणि विकास कामे शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटीबद्ध – प्रविण दरेकर

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटीबद्ध – प्रविण दरेकर

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटीबद्ध - प्रविण दरेकर

सातारा, 24 मे (हिं.स.) – शेतकरी यात्रेला वारी एवढ्यासाठी म्हटले आहे की पांडुरंगाकडे जाताना वारी केली की विश्वास असतो, पांडुरंग पावेल तसाच विश्वास आताचे जे शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे. त्या सरकारवर सर्वसामान्य लोकांचा विश्वास आहे. सदाभाऊ खोत हे घटक पक्ष जरी असले तरी पूर्णपणे सरकार त्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटीबद्ध असून ज्या मागण्या सदाभाऊ खोत करतील त्या सरकार पूर्ण करेल, असा विश्वास भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कराड ते सातारा ‘शेतकरी वारी’ पदयात्रा सुरु आहे. या पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशी (मंगळवारी) दरेकर यांनी शासनाचा प्रतिनिधी म्हणून भेट दिली.

यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले की, सदाभाऊंचे शेतकरीविषयी असणारे प्रेम संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या शेतकरी नेत्याला राज्याचे कृषी राज्यमंत्री पद दिले. कुठलेही सरकार असो शेतकऱ्यांचे प्रश्न शंभर टक्के सोडवू शकले नाहीत. त्यामुळे आजही शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. हा देश कृषीप्रधान देश आहे. ६० टक्के लोकं आज शेतीवर अवलंबून आहेत. शेतकरी, बळीराजा पिकं पिकवतो म्हणून उद्योगपती, उद्योजक खाऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे. मीही नांगरणी, पेरणी केली आहे. त्यामुळे माझ्या संवेदना शेतकऱ्यांप्रती आहेत. शेतकऱ्यांचा माल शहरात नेऊन संत शिरोमणी आठवडी बाजार सुरु झाला होता. तो पुन्हा सुरु करावा अशी मागणी आहे. या राज्यात शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांच्या संवेदना जाणारे शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे. त्यामुळे पुन्हा मुंबई शहरात हा आठवडी बाजार सुरु करून घेऊ असे आश्वासन आ. दरेकर यांनी दिले.

आ. दरेकर पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. यासाठी फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांना उसापासून इथेनॉल परवानगी द्या ही मागणी आहे. त्यात काय अडचण आहे. जर कारखान्यांना इथेनॉलची परवानगी देणार असू व फार्मर्सने एकत्रित येऊन केलेल्या प्रोड्यूसर कंपन्या इथेनॉल निर्मितीसाठी पुढे येणार असतील तर ही मागणीही आग्रहाने शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी स्वतः पुढाकार घेईन या आश्वासनासोबत दरेकर यांनी ऊस उत्पादक, वाहतूकदार यांचा प्रश्न नक्की उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडेन, असेही सांगितले. तसेच शेतकऱ्यांना कर्ज घ्यायचे असेल तर जिल्हा बँक, अर्बन, नागरी सहकारी बँका पैसे देतात. परंतु ज्या मोठ्या बँका आहेत. खासगी, राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांना सरकारची मदत असते. परंतु याच बँका नियमाच्या शंभर अटी घालून सिबिल दाखवल्याशिवाय कर्ज देत नाहीत. अशा प्रकारच्या ज्या जाचक अटी आहेत त्याही काढून बळीराजाला सहज कर्ज कसे देता येईल यासाठी आग्रही भुमिका घेऊ, असा विश्वासही आ. दरेकर यांनी उपस्थितांना दिला.

आ. दरेकर म्हणाले की, काजू उत्पादकांना फेणी बनविण्यासाठी लायसन्स हवेय. कर्जाच्या संदर्भात त्यांना सवलती हव्या आहेत. कोकणात मोठ्या प्रमाणावर काजू उत्पादन होते. परंतु ज्या प्रमाणात तेथे काजुवर, काजूच्या बोंडावर प्रक्रिया व्हायला पाहिजे व तेथील काजू उत्पादक सधन झाला पाहिजे त्याप्रमाणे होत नाही. त्याही दृष्टीने या आंदोलनाची दखल घेऊन सरकारला कार्यवाही करण्यास भाग पाडू. त्याचबरोबर सरपंचांच्याही काही मागण्या आहेत. सरपंच समाजकारणाचा कणा आहे. त्यालाही सन्मानाची अपेक्षा स्वाभाविक आहे. मी निश्चितच सरपंचांच्या मंत्रालयाच्या प्रवेशासाठी शासनाला ओळखपत्र देण्यासाठी निर्णय घ्यायला लावेन, हा विश्वास शेतकरी वारीनिमित्त देत असल्याचे आ. दरेकरांनी म्हटले.

… असा विश्वास मला फडणवीसांनी दिला

आ. दरेकर म्हणाले की, पुण्यातील प्रकल्पासाठी संपादित केलेल्या पाच गावाच्या जमिनींचा परतावा देण्याबाबत महसूल मंत्री, संबंधित खात्याशी बोलू. तुमच्या सर्व विषयासंबंधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. तुमच्या ज्या-ज्या मागण्या आहेत, ज्या-ज्या सरकारला देणे शक्य आहेत त्या सर्व मागण्या मान्य करू अशा प्रकारचा विश्वास फडणवीस यांनी मला या शेतकरी वारीला येताना दिल्याचे त्यांनी सांगितले.

हेलिकॉप्टरने केवळ फोटोग्राफी करणारे मुख्यमंत्री शिंदे नाहीत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करतात. हेलिकॉप्टरने जात असतील परंतु शेतात हेलिकॉप्टरने नांगरणी करत नाहीत. शेतकऱ्यांच्या संवेदना जाणणारे मुख्यमंत्री आहेत. हेलिकॉप्टरने केवळ फोटोग्राफी करणारे मुख्यमंत्री शिंदे नाहीत तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीतले प्रश्न समजणारा, शेतीतील अडचणी जाणणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे, असा टोला यावेळी आ. दरेकरांनी विरोधकांना लगावला.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.