Home मराठी बातम्या पायाभूत सुविधा आणि विकास कामे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेची नालेसफाईसाठी हेल्पलाईन सुरू

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेची नालेसफाईसाठी हेल्पलाईन सुरू

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेची नालेसफाईसाठी हेल्पलाईन सुरू

ठाणे, 23 मे (हिं.स.) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे ठाणे महानगरपालिकेने, नालेसफाईबाबत तक्रारी आणि अभिप्राय नोंदविण्यासाठी हेल्पलाईन ( क्रमांक ०२२ – २५३९९६१७) सुरू केली आहे. त्यावर ठाणेकर नालेसफाई बाबतचा प्रतिसाद नोंदवू शकतात, पालिका त्याची तत्काळ दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करेल, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी ठाणे शहरातील रस्ते आणि नाले सफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी दौरा केला. कॉनवूड जंक्शन येथील चौक सुशोभीकरण व रस्त्याचे काम, पवार नगरमधील रस्त्यांची कामे, टिकुजिनी वाडी ते नीलकंठ रस्ता, घोडबंदर रोडवरील आनंद नगर येथील नाला, कोरम मॉल मागील नाला आणि ज्ञानसाधना महाविद्यालय येथील परबवाडीजवळील नाला, तसेच, महामार्गाखालील गटार व नवीन भुयारी मार्ग यांची पाहणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. या दौऱ्यात, आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश म्हस्के, मिनाक्षी शिंदे, राम रेपाळे, हनुमंत जगदाळे, विकास रेपाळे, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर सहभागी झाले होते.

… त्या अधिकाऱ्यावर कारवाई!

वसंत विहार येथील कॉर्नवुड चौक येथील मलनिस्सारण कामाची पाहणी करून कामास विलंब झाल्याबद्दल संबंधित कार्यकारी अभियंत्याना खडेबोल सुनावले. तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या कामातील हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्याकडून खुलासा मागवण्याचे आदेश दिले. हा खुलासा समाधानकारक नसेल तर त्या अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करुन तत्काळ कारवाई करावी, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महापालिका आयुक्त श्री. बांगर यांना सांगितले.

कंत्राटदाराला दंड

टिकूजीनीवाडी ते नीळकंठ टॉवर येथील काँक्रिट रस्त्याची पाहणी करीत असताना रस्त्याचे काम गुणवत्तापूर्वक झाले आहे का याची मशीनच्या साहाय्याने पाहणी करून रस्त्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच येथील सायकल ट्रॅकचीही पाहणी केली. दरम्यान, निळकंठ टॉवर परिसरातील रस्त्याचे काम करणाऱ्या कामगारांकडे हॅण्डगोव्ह्ज, बूट आदी कोणतेही सुरक्षा साहित्य नसल्याचे निदर्शनास आल्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्या कंत्राटदाराला दंड करण्याचे आदेश दिले.

नाले सफाईची कामे वेळेत पूर्ण व्हायला हवीत

पावसाळ्यापूर्वीची नाले सफाईची कामे वेळेत पूर्ण व्हायला हवी. पावसाळ्यात खड्ड्यांचा त्रास लोकांना होऊ नये, यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे. पावसाळ्यात ज्या ठिकाणी खड्डे पडणार नाहीत, नाले तुंबणार नाहीत, यासाठी चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येईल. निष्काळजीपणा आढळेल व नागरिकांना त्रास होईल, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

ठाणेकरांना मिळतील खड्डेमुक्त रस्ते

ठाणे महापालिका क्षेत्रात रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. कामे चांगल्या पद्धतीने होत असून ज्या ठिकाणी पावसाळ्यात खड्डे पडत होते त्या ठिकाणी युटीडब्ल्यूटी तसेच मास्टीक पद्धतीने कामे झाली आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात ठाणेकरांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे सांगितले. तसेच जी कामे सुरू आहेत ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देत असतानाच कामांचा दर्जा गुणवत्तापूर्ण असलाच पाहिजे आणि कामात हलगर्जी नको, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. त्याचवेळी, कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या सूचनाही त्यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या.

ठाणे शहरासाठी राज्य शासनाकडून ६०५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या अंतर्गत सध्या २८२ रस्त्यांची कामे प्रभागसमितीनिहाय सुरू आहेत. यात २१४ कोटी रुपयांच्या पहिल्या पॅकेजमध्ये १२७ रस्त्यांची कामे सुरू आहेत. तर, ३९१ कोटी रुपयांच्या दुसऱ्या पॅकेजमध्ये १५५ रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याशिवाय, महापालिकेच्या निधीतून सुरू असलेली रस्त्यांची कामे, सरकारी योजनांमधून सुरू असलेली रस्त्यांची कामे, इतर प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी मा. मुख्यमंत्री यांनी केली.

या सर्व रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजेत अशी अपेक्षा आहे. रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासण्यासाठी आयआयटीला त्रयस्थ संस्था म्हणून परिक्षण करण्याचे काम दिले आहे. नवीन रस्त्यांमध्ये खड्डे पडले तर एका खड्ड्याला एक लाख रुपये दंड अशी टेंडरमध्ये अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामांचा दर्जा राखला जाईल. ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी महापालिका आयुक्त व संबंधित अधिकारी पाठपुरावा करत आहेत, असे श्री. शिंदे म्हणाले.

सुशोभीकरणाची निगा व देखभालीच्या सूचना

ठाणे शहरातील विविध चौकात सुशोभीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू असून शहरातील बदल दिसू लागले आहेत. मात्र हे बदल कायमस्वरूपी राहण्यासाठी नियमित निगा व देखभाल राहील, याकडे लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केल्या.

सफाई कामगाराशी साधला संवाद

ठाण्यातील पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार नगर येथील सायकल ट्रॅकची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याबरोबर संवाद साधला त्यांची जबाबदारी व त्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माहिती घेतली. तसेच कर्मचाऱ्यांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहू नये, त्यांना काम करण्यासाठी पूरक वातावरण निर्माण होइल असा प्रयत्न व्हावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.