Home मराठी बातम्या पायाभूत सुविधा आणि विकास कामे सावरकर यांच्यावरील ऐतिहासिक अन्याय दूर करावा : राज्यपाल

सावरकर यांच्यावरील ऐतिहासिक अन्याय दूर करावा : राज्यपाल

सावरकर यांच्यावरील ऐतिहासिक अन्याय दूर करावा : राज्यपाल

मुंबई, 22 मे (हिं.स.) : स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महान नायक होते. ते द्रष्टे समाज सुधारक व जातीभेदाचे कट्टर विरोधक होते. दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळात सावरकर तसेच इतर अनेक क्रांतिकारकांच्या योगदानाकडे डोळेझाक करण्यात आली. खोट्या सिद्धांताच्या आधारे अनेक क्रांतिकारकांना बदनाम करण्यात आले. क्रांतिकारकांवरील हा अन्याय दूर करण्याची वेळ आली असून सर्वच क्रांतिकारकांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारे २०२३ वर्षाचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते रविवारी (दि. २१) स्मारकाच्या दादर येथील सभागृहात प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांना यावेळी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ मरणोपरांत प्रदान करण्यात आला. भारावलेल्या वातावरणात झालेल्या पुरस्कार सोहळ्यात मेजर राणे यांच्या आई वीरमाता ज्योती राणे यांनी हा पुरस्कार राज्यपालांकडून स्वीकारला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निःस्वार्थ कार्याला कुणी नाकारत तर देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांचे कार्य तसेच वीरमरण प्राप्त झालेल्या सैन्य दलातील अधिकारी व जवानांचे बलिदान देखील नाकारल्यासारखे होईल व ही गोष्ट कोणतीही देशप्रेमी व्यक्ती सहन करणार नाही असे राज्यपालांनी सांगितले.

सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूर येथे त्यांचे भव्य स्मारक व्हावे तसेच ‘ने मजसी ने’ व ‘जयोस्तुते’ या सावरकरांच्या रचना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या जाव्या अशी सूचना राज्यपालांनी केली.

राज्यपालांच्या हस्ते आयआयटी कानपूरचे संचालक डॉ. अभय करंदीकर यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार’ देण्यात आला, तर नागपूर येथील ‘मैत्री परिवार’ या संस्थेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवा पुरस्कार’ देण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारांच्या प्रचार व प्रसार कार्यासाठी प्रदीप परुळेकर यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती चिन्ह’ पुरस्कार देण्यात आला.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी प्रास्ताविक केले, तर स्मारकाचे अध्यक्ष निवृत्त पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित यांनी आभार प्रदर्शन केले. ज्योती राणे यांनी कृतज्ञता सोहळ्याला उत्तर दिले. स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, विश्वस्त मंजिरी मराठे व स्वप्नील सावरकर तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.