Home मराठी बातम्या पायाभूत सुविधा आणि विकास कामे पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी दक्ष रहाणे आवश्यक – ठाणे आयुक्त

पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी दक्ष रहाणे आवश्यक – ठाणे आयुक्त

पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी दक्ष रहाणे आवश्यक – ठाणे आयुक्त

ठाणे, २१ मे, (हिं. स) : पावसाळ्यात महापालिकेसह सर्व यंत्रणांचे समन्वयक अधिकारी कायम उपलब्ध हवेत. त्यांचे मोबाईल बंद असू नयेत, नेटवर्क मध्ये नाही, रेंज नाही, मोबाईल चार्जिंग संपले अशा कोणत्याही सबबी सांगू नयेत. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी २४ तास आणि सातही दिवस उपलब्ध असणे अपेक्षित आहे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

आपत्कालीन व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणांची मान्सून पूर्व आढावा बैठक ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात नुकतीच झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर होते.

*गटाराच्या चेंबरवर झाकण नसेल तर कारवाई*

रस्त्यावरील गटाराच्या चेंबरचे झाकण नसल्याने कोणतीही दुर्घटना झाली तर गंभीर कारवाई करण्यात येईल. अशा दुर्घटना टाळणे शक्य आहे. त्यामुळे, सगळी गटारे, त्यांच्या जाळ्या, झाकणे यांची तपासणी करून घ्यावी. फुटभर पाणी साचलेले असेल आणि गटाराचे झाकण उघडे असेल तर त्यात पडून जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यात तेल घालून याची पाहणी करावी. एकही झाकण उघडे दिसले तर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त श्री. बांगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला.

*रेल्वे वाहतूक सुरळीत राहण्यासाठी…*

रेल्वे मार्ग सुरळीत राहण्यासाठी मुलुंड ते दिवा या पट्ट्यातील सर्व नाल्यांची काळजीपूर्वक सफाई केली जावी. रेल्वेच्या हद्दीतील नाले सफाई, गटारे सफाई करताना मशीन उतरवणे शक्य होत नाही. तेथे मनुष्यबळाचा वापर करून गाळ काढला जावा, अशी सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी केली.

नौपाडा आणि कोपरी येथे रेल्वे रुळांवर पाणी येवू नये म्हणून पट्ट्या टाकल्या जातात, त्यामुळे पाणी तेथे अडून माघारी येते. त्यामुळे, पाणी नियमित वाहत असेल तेव्हा पट्टी टाकली जावू नये, असे ठाणे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. याच भागात छोटे भुयारी गटार केले तर ठाणे यार्ड मधील पाणी साठण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच, कोपरी येथील चिंधी मार्केटमधील कचरा रेल्वे हद्दीत टाकला जातो, त्यामुळे आतील गटारे तुंबतात, हेही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले. भुयारी गटार बांधण्यासाठी नियोजन पावसाळ्यात करून घ्यावे आणि पावसाळा संपला की बांधकाम करावे, असे आयुक्तांनी सांगितले. तसेच, चिंधी मार्केट मधील कचऱ्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.

वाघोबा नगर, भास्कर नगर येथील अतिक्रमणामुळे रस्ता खचला आहे. कुपण भिंतीच्या वर असलेली बांधकामे रेल्वेसाठी धोकादायक ठरू शकतील. या भागाची पाहणी करून योग्य तो उपाय करावा असे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच, हे काम पावसाळ्यानंतर होणार असल्याने रेल्वे आणि पालिका या दोन्ही यंत्रणांनी या वेळच्या पावसाळ्यात अधिक सतर्क राहावे, असेही आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले.

पारसिक बोगद्यावरील काही झाडेही धोकादायक झाली आहेत, तर रेल्वे लगतच्या इमारतींमधील सुमारे ७२ झाडांच्या फांद्या रुळांवर येत आहेत, त्यांची छाटणी लवकर व्हावी, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उद्यान विभागाने हे काम प्राधान्याने करावे, असे आयुक्तांनी सांगितले.

*मेट्रोसाठी आवश्यक तेवढेच बॅरिकेडींग करावे*

शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामासाठी केलेले बॅरिकेडींग आवश्यक तेवढेच ठेवा. म्हणजे वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल, असे आयुक्त श्री. बांगर म्हणाले. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील मॉडेला नाका चौक ते तीन हात नाका येथील बरिकेडींग किमान दोन फुटाने कमी केले तर तिथे कोंडी होणार नाही, असेही आयुक्त म्हणाले.

घोडबंदर सर्व्हिस रोड वरील कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करून जास्तीत जास्त मार्ग रहदारी साठी उपलब्ध करून देवू असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

*”वीज पुरवठा खंडित होणार असेल तर आधी कळवा”*

पावसाळ्यात कोणत्याही भागात दुरुस्तीसाठी ठरवून वीज पुरवठा बंद केला जाणार असेल तर ती माहिती जिल्हा, पोलीस आणि महापालिका यांच्या आपत्ती कक्षाला आधी द्यावी. तसेच, आयत्यावेळी वीज खंडित झाली असेल तर कोणत्या भागात वीज नाही, दुरुस्तीला किती वेळ लागेल हेही आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवावे. म्हणजे ती माहिती अत्यावश्यक यंत्रणांना कळविणे सोपे जाईल, असे आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.

धोकादायक पोल, उघड्या वीज वाहिन्या, डीपी यांची पाहणी करून योग्य ती देखभाल दुरुस्ती केली जावी. नाले सफाई, रस्त्याची कामे यावेळी तेथे महावितरणचा स्थानिक अधिकारी हजर राहील, असे पहावे, असेही आयुक्त म्हणाले.

काही ठिकाणी महापालिकेच्या पोल वरून वायर ओढून वीज पुरवठा करण्यात आलेला आहे. त्यामुळे ते पोल धोकादायक झाले आहेत. तेथे महावितरणचे पोल टाकण्यासाठी मान्यता मिळाली आहे. निविदा प्रकिया सुरू आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

*नाल्यांसाठी मार्ग काढून द्यावा..*

कौसा, शीळ, डायघर, दिवा या भागात मातीची भरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे पाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद होत आहेत. या भागात नाले काढण्यासाठी स्थानिक विरोध करतात. तेथे तहसीलदारांनी हस्तक्षेप करून नाल्यांसाठी मार्ग काढून द्यावा, असे आयुक्त श्री. बांगर म्हणाले.

तसेच, मुंब्रा, दिवा, कोपर येथे मातीचे उत्खनन सुरू असल्याने भविष्यात रेल्वे मार्गावर धोका होऊ शकतो, याची महसूल विभागाने नोंद घ्यावी, असेही आयुक्तांनी सांगितले.

*आरोग्य यंत्रणा सतर्क हवी*

पावसाळी आजारांवरील औषधे, आपत्कालीन परिस्थतीमध्ये वरिष्ठ डॉक्टरांची उपलब्धता, फिल्ड वर पाठविण्याचे वैद्यकीय पथक याची तयारी ठेवावी. पावसाळी आजारांवरील उपचाराची औषधे, सर्प दंशांवरील उपचार हे सर्व नागरी आरोग्य केंद्रात उपलब्ध असावेत. सगळ्यांना प्रत्येक उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात यावे लागू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच, आशासेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्याकडे अत्यावश्यक औषधे, ओआरएस यांना साठा द्यावा. म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी नागरी आरोग्य केंद्रात यावे लागणार नाही, असेही आयुक्त म्हणाले.

*पर्यायी रुग्णालय म्हणून काम करावे…*

तसेच, सिव्हिल रुग्णालयाचे काम सध्या पूर्ण क्षमतेने सुरू नाही. हे लक्षात घेवून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आपत्कालीन व्यवस्थेचे नियोजन करावे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त डॉक्टर्स आणि नर्स उपलब्ध करून द्यावेत, असेही आयुक्तांनी सांगितले.

दूषित पाण्याच्या तक्रारींची आजवरची ठिकाणे हेरून त्या भागात पाणी शुद्धीकरणाची औषधे वाटणे, साथीच्या आजारांचे प्रादुर्भाव होणारे विभाग लक्षात घेवून प्रतिबंधात्मक उपाय केले जावेत, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

टँकर, हातपंप, विहीर अशा स्रोतांमधून घेतले जाणारे पाणी तपासावे. दूषित पाणी असेल तर त्याचा वापर बंद करा, अशी सूचना आयुक्तांनी केली.

ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापनाने आयोजित केलेल्या या बैठकीस, अतिरीक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उपायुक्त जी. जी. गोदेपूरे, महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत, ठाणे जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी, पोलीस आयुक्तांचे प्रतिनिधी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मध्य रेल्वेचे अधिकारी, महावितरण, आरटीओ, एस टी, टी एम टी, महानगर टेलिफोन निगम, एमआयडीसी, मुंबई मेट्रो, टोरंट वीज कंपनी, महानगर गॅस, इंडीयन रेडक्रॉस, लायन्स क्लब तसेच महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.