Home मराठी बातम्या पायाभूत सुविधा आणि विकास कामे बाळासाहेबांप्रमाणेच कोकणाकडे लक्ष दिले जाईल – मुख्यमंत्री

बाळासाहेबांप्रमाणेच कोकणाकडे लक्ष दिले जाईल – मुख्यमंत्री

बाळासाहेबांप्रमाणेच कोकणाकडे लक्ष दिले जाईल – मुख्यमंत्री

रत्नागिरी, 19 मार्च, (हिं. स.) : बाळासाहेबांनी जसे प्रेम दिले, तसे कोकणाकडे विशेष लक्ष दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. खेड येथे आज आयोजित सभेत ते बोलत होते.

खेडमधील महाड नाका येथील एसटीच्या मैदानात शिवसेनेतर्फे निष्ठावंतांची ही सभा झाली. यावेळी हजारो शिवसैनिकांनी हजेरी लावली. यावेळी माजी मंत्री रामदास कदम, खासदार गजानन कीर्तीकर, पालकमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिवसेना सचिव सिद्धेश कदम, आमदार योगेश कदम, आमदार अरविंद सावंत, शिवसेना प्रतोद भरत गोगावले, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते. प्रारंभी श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. मुस्लिम, कुणबी आदी विविध समाजाच्या, संघटनांनीही मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी उद्धव ठाकरे यांचा व्हिडीओ दाखविण्यात आला. यावेळी खेड, दापोली, मंडणगड, गुहागर, चिपळूण तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी शिवसेनेत प्रवेश केला.

मुख्यमंत्री म्हणाले, खेडमध्ये पूर्वी झालेली (उद्धव ठाकरे यांची) सभा आणि आताची सभा याची तुलना करायला मी आलो नाही. कोकण ही लोकमान्य टिळक, सावरकरांची कर्मभूमी आहे. बाळासाहेबांची सभा या मैदानात झाली होती. आजच्या सभेला लोटलेला जनसागर कोकणी माणसाने बाळासाहेब यांच्यावर केलेले प्रेम दाखवून देतो. कोकणी माणूस जसा बाळासाहेबांच्या पाठीशी होता तसाच कोकणी माणूस आजही त्यांच्या विचारांशी एकनिष्ठ आणि त्यांच्या शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभा आहे. कोकणी माणसाने एकदा शब्द दिला की तो कायमचा मागे उभा राहतो. कोकणचा माणूस प्रेमळ आहे म्हणूनच बाळासाहेबदेखील त्यांच्यावर प्रेम करत होते. परंतु सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे पक्ष गहाण ठेवला तो सोडविण्याचे काम केले. बाळासाहेबांच्या विचारांशी फक्त मुख्यमंत्रिपदासाठी गद्दारी केली. तो डाग पुसण्याचे काम आम्ही केले. त्यामुळे आमच्याकडे पक्ष आणि चिन्ह दोन्ही निवडणूक आयोगाने दिले. बाळासाहेबांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे. बाळासाहेब म्हणायचे की सत्ता येते-जाते, पैसा येतो-जातो, पण एकदा नाव गेले तर ते परत मिळत नाही. आपल्याला शिवसेनेला पुढे न्यायचे आहे. राहुल गांधी सावरकरांच्या विरोधात सतत बोलतात, तेव्हा तुम्ही मूग गिळून बसता, हे कसले हिंदुत्व आहे? आम्ही सावरकरांचा अवमान सहन करू शकत नाही. तुम्ही खोकेखोके बोलून किती पाप झाकण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब तुमचे वडील आहेत, पण ते आमचे दैवत आहेत. त्यांना वडीलवडील करून तुम्ही छोटे करू नका. महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही. ७० वर्षे देशाची लूट करणाऱ्या टोळी सोबत तुम्ही आहात की काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे सांगणाऱ्यांसोबत तुम्ही आहात, हे एकदा सांगा. परदेशात या देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांसोबत तुम्ही आहात का? बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या नरेंद्र मोदींसोबत आम्ही गेलो. ३७० कलम मोदींनी हटवले नसते, तर राहुल गांधींनी काश्मीरमध्ये झेंडा फडकवला असता का? तुम्ही बाळासाहेबांच्या केवळ संपत्तीचे वारस असाल पण आमची संपत्ती बाळासाहेबांचे विचार आहेत. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला दूर ठेवले, अशा काँग्रेसच्या राहुल गांधीच्या गळ्यात भेट घेऊन आदित्य ठाकरे फिरत आहेत. जो राज्य जिंकू शकत नाही तो देश कसा जिंकू शकतो? अशा माणसासाठी बाळासाहेबांचा मुलगा आणि नातू मते मागतात. यापेक्षा राज्याचे दुर्दैव दुसरे काय असेल? अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना तुम्ही म्हणालात, त्यांनी शेण खाल्ले. मग त्यांच्या पंगतीत बसून तुम्ही काय खाताय? मी मिंधा नाही, गद्दार नाही. मी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. हा सत्तेसाठी कधी मिंधा होणार नाही. शिवतीर्थावर मनोहर जोशी यांना खाली उरवण्याचा कट केला, तसा रामदासभाई यांच्याबाबत षण्मुखानंद सभागृहात कट होता. बाळासाहेब सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जात होते. धर्मवीर जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी शब्द टाकला. बाळासाहेब संघटनावाढीसाठी खस्ता खाणाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहत. जेव्हा कार्यकर्ते मोठे होतात, तेव्हा तुम्हाला का पोटदुखी सुरू होते? राज ठाकरें, नारायण राणे यांचे काय म्हणणे होते? ठाणे येथे भगवा टिकवण्यासाठी राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला. रामदास भा, गुलाबराव यांच्या भाषणाला टाळ्या पडतात, म्हणून त्यांची भाषण बंद करता. सगळे जातील, तुम्ही फक्त हम दो हमारे दो राहाल. तुम्ही किती माणसे संघटनेतून घालवली? स्वतःवर विश्वास पाहिजे. एकनाथ शिंदे कालदेखील कार्यकर्ता होता आणि पुढेदेखील कार्यकर्ता म्हणून काम करेल.

आपल्या सरकारच्या विकासकामांचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले, मी फिरणाराच मुख्यमंत्री आहे. मी दिल्लीला जातो, पण हजारो कोटींचा निधी आणतो. उदय सामंत यांनी १ लाख ३७ हजार कोटींचे करार केले आहेत. मला अहंकारापेक्षा विकास महत्त्वाचा आहे. हे सरकार सायलेंट नाही. अलर्ट मोडमध्ये आहे. आम्ही अनेक निर्णय घेतले आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले, महिलांना, वृद्ध यांना एस्टी प्रवास सवलत दिली. आम्ही गाजराचा हलवा तरी दिला तुम्ही फक्त गाजर दाखवत राहिलात. आम्ही कोकणासाठी भरभरून द्यायला आलो आहे. समुद्रात वाहून जाणारे कोयनेचे ६४ टीएमसी पाणी वाया जाऊ देणार नाही. लवकरच बैठक घेऊ. २४३ कोटींचा पोयनार प्रकल्प, न्यू मांडवे प्रकल्प मंजूर केला जाईल. लघु आणि मध्यम प्रकल्प पुनरुज्जीवित करू. निधी कमी पडू देणार नाही. खेडची ४३ कोटीची नळपणी योजना, क्रोकोडाइल पार्क, साने गुरुजी, डॉ. आंबेडकर स्मारकासाठी दोन कोटी, अल्पसंख्याक भवनासाठी कोटी, कुणबी भवनासाठी दोन कोटी मंजूर केले. काजू आणि आंब्यासाठी योजना मंजूर केल्या. विद्युत वाहिन्यांसाठी दोन हजार कोटीची तरतूद, मच्छीमार बांधवांसाठी विशेष योजना आखली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचा एक मार्ग मेपर्यंत सुरू होईल आणि डिसेंबरपर्यंत मार्ग पूर्ण होईल. ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे आणि सागरी महामार्ग उभारून कोकणातील तरुण कोकणात रोजगार करेल, अशी तजवीज सरकार करत आहे. मंडणगडमध्ये औद्योगिक वसाहत करण्याचा निर्णय लवकरच होईल.

आपल्यावर झालेल्या टीकेचा समाचार घेताना श्री. शिंदे म्हणाले, चिपळूण, महाड, खेड येथे जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, तेव्हा एकनाथ शिंदे येईल. कारण घरी बसून आदेश देणारा हा मुख्यमंत्री नाही, तर जीव पणाला लावूनन संकटात प्रत्यक्ष जाऊन काम आम्ही करतो. आम्ही असे काम करतो हा आमचा गुन्हा आहे का? घरात बसून आदेश देण्याचे काम न करता रस्त्यावर उतरून काम केले, हा आमचा गुन्हा आहे का? आम्हाला गद्दार म्हणता, मी कधी आरोपाला आरोपातून उत्तर देत नाही. पण सहन करण्याची एक मर्यादा असते. ती वेळ आमच्यावर आणू नका. बाळासाहेबांनी जसे प्रेम दिले, तसे कोकणाकडे विशेष लक्ष दिले जाईल. कोकणासाठी एक मोठे प्राधिकरण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. योगेश कदम हा रामदास कदमांचा बछडा आहे. पुढच्या काळात योगेश कदम एवढे काम करेल की समोरच्याचे डिपॉझिट जप्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

रामदास कदम म्हणाले, दिवसरात्र काम करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला बाळासाहेबांनी जन्म दिला, हे उद्धव ठाकरे सांगत आहेत. पण तेच बाळासाहेब म्हणाले होते की मला काँग्रेससोबत जायची वेळ आली तर शिवसेना नावाचे हे दुकान मी बंद करून टाकेन. हे ते का सांगत नाहीत? मला २००९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पाडले. कारण विरोधी पक्षनेता पुढचा मुख्यमंत्री बनतो. कदाचित मला बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केले असते. कोकण एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठाम उभे आहे. खेड, दापोलीत भव्य कुणबी भवन, मुस्लिम समाजासाठी एक भवन, डॉ. बाबसाहेब आंबेडकर सभागृह, खेडच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जागा देऊन न्याय द्यावा, अशी विनंती श्री. कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

खासदार गजानन कीर्तीकर म्हणाले, लोकप्रियतेच्या उंचीवर पोहोचलेले पहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ज्यांनी उठाव करून क्रांती केली, त्याची लोकसभेत आजही चर्चा होते. माझी ५६ वर्षांची कारकीर्द शिवसेनेत झाली. परंतु उद्धव ठाकरे यांच्या प्रमुखपदाच्या कारकिर्दीत ज्या पद्धतीने शिवसेना चालवली जायची, त्यात काही लोक तळी उचलायचे काम करत होती. बाळासाहेबांचे विचार, आक्रमकता, मराठी माणसाचा सर्वांगीण विकास या सगळ्या गोष्टी पुसल्या जात होत्या.

उदय सामंत म्हणाले, या सभेने सिद्ध केले आहे की दोन वर्षांनंतरचा आमदारदेखील योगेश कदमच असेल. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कोकणासाठी काय दिले हे संपूर्ण कोणाला माहिती आहे. मागच्या अडीच वर्षांत काय झाले, हे सांगण्यासाठी पाच तारखेची सभा असेल असे आम्हाला वाटले होते. पण त्यातले काही ऐकायला मिळाले नाही. योगेश कदमांना संपवण्यासाठी काय नियोजन सुरू होते, त्याचा मी साक्षीदार आहे. योगेश कदम यांना पंचायत समिती निवडणुकीत पराभूत करून ती पंचायत समिती राष्ट्रवादीच्या घशात घालायचे काम तत्कालीन पालकमंत्र्यांनी केले. निष्ठावान शिवसैनिकांनी ही बाब लक्षात घ्यावी. एव्हढा जन संपर्क ठेवणारा मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहेत.

दीपक केसरकर म्हणाले, पर्यटन खात्याला दिलेला निधीतून कोकणासाठी आदित्य ठाकरे काहीही खरेदी करू शकले नाहीत. कोकणातला महसुली प्रश्न सोडवण्यासाठी स्थगिती उठवण्याची विनंती करूनही उठवण्यात आली नाही. कोकणातल्या शेतकऱ्याला पन्नास हजार देण्याची घोषणा केली, मात्र आघाडी सरकारने ते होऊ दिले नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा साडेचारशे कोटी रुपयांचा विकास निधी काढून घेतला. केवळ सरकार जाईल या भीतीने उद्धव ठाकरे काही बोलले नाहीत. उद्धव ठाकरे व नरेंद्र मोदी यांची भेट घडवण्यात माझा मोठा वाटा आहे. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मोदींना सांगितले होते की मी पुन्हा युती करेन, पण त्यांनी शब्द फिरवला. कोणीही आमदार पैशाने विकला जात नाही. केवळ बाळासाहेबांच्या विचारांसाठी आम्ही शिवसेनेत राहिलो. योग्यवेळी आम्ही उद्धव ठाकरेंना मदत केली, मात्र त्यांनी पाठीत खंजीर खुपसायचे काम केले. अडीच वर्षांत संभाजीनगर नामांतर केले नाही. सत्ता गेल्यानंतर ठाकरेंनी कॅबिनेट बैठक घेऊन नामांतर केले, पण त्याला केंद्राची मंजुरी एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी मिळविली. पक्षप्रतोद भरत गोगावले, आमदार योगेश कदम यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.