Home मराठी बातम्या पायाभूत सुविधा आणि विकास कामे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरास भेट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरास भेट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरास भेट

पुणे 13 मे (हिं.स) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध यांच्यावतीने शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. करिअर घडविण्यासाठी कौशल्य महत्वाचे असून विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाकडे वळावे असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.

यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, कौशल्य विकास रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकता विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार, सहआयुक्त एस.बी. मोहिते, औंध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक आर.बी. भावसार, प्राचार्य आय.आर. भिलेगांवकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाचे सहसंचालक यतिन पारगावकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बी.आर. शिंपले आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, दहावी, बारावी नंतर विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्यावतीने ६ जूनपर्यंत या शिबीरांचे आयोजन राज्यातील २८८ मतदार संघात करण्यात आले आहे. ही शिबीरे प्रत्येक जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमार्फत घैण्यात येत आहेत. पदवी शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त होते, व्यक्तिमत्व घडविता येते, परंतु देशाला श्रीमंत बनवायचे असेल तर कौशल्य विकासाशिवाय पर्याय नाही. विविध प्रकारची कौशल्ये आत्मसात करण्यासाठी कमी कालावधीचे व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यातूनही युवकांना स्वत:चा विकास साधता येईल.

महाराष्ट्र शासनाने दरवर्षी ३० लाख एवढी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकडून ८ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना १५ लाख रुपये कर्ज विनाव्याज दिले जाते. याचा लाभ आत्तापर्यंत ५३ हजार तरुण-तरुणींनी घेतला आहे. शासनाच्या योजनांचा लाभ घेत कौशल्य प्राप्त करून युवकांनी नोकऱ्या देणारे व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.