Home मराठी बातम्या पायाभूत सुविधा आणि विकास कामे वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कोळसा क्षेत्र सज्ज – प्रल्हाद जोशी

वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कोळसा क्षेत्र सज्ज – प्रल्हाद जोशी

वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कोळसा क्षेत्र सज्ज - प्रल्हाद जोशी

नवी दिल्ली, 06 जून (हिं.स.) : पावसाळ्याच्या मोसमात देखील देशामध्ये कोळशाची टंचाई जाणवणार नाही अशी ग्वाही केंद्रीय कोळसा, खाण तसेच संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. वेगाने विकसित होणाऱ्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कोळशाची देशांतर्गत वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आपले कोळसा क्षेत्र पूर्णपणे सज्ज आहे असे ते म्हणाले.

केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या अखत्यारीतील कोल इंडिया (सीआयएल)या कंपनीने आज नवी दिल्ली येथे “भूमिगत कोळशाचे खनन – शाश्वत उर्जा सुरक्षेसाठीचा भावी मार्ग” या कल्पनेवर आधारित उच्चस्तरीय परिषद तसेच प्रदर्शनाचे आयोजन केले होते, त्यामध्ये बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कोल इंडिया या कंपनीला येत्या 2 ते 3 वर्षांत कोळसा निर्यातक म्हणून उदयाला येण्याचे आवाहन केले. कोल इंडिया आणि तिच्या उपकंपन्यांनी या वर्षी विक्रमी कोळसा उत्पादन केल्याबद्दल त्यांची प्रशंसा करून केंद्रीय मंत्री म्हणाले की, कोळसा क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी शाश्वत खननाची सुनिश्चिती होणे आवश्यक आहे. कोळसा उत्पादन वाढविण्यावर लक्ष केंद्रित करतानाच कोळसा खाणींमधील सुरक्षितता सुनिश्चित करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी संबंधितांना केली.

जागतिक अर्थव्यवस्था सध्या मंदीच्या प्रभावाखाली असताना, वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेकडे जग आशेने पाहत आहे याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. येत्या काही वर्षांमध्ये, देशातील उर्जेची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी कोळसा क्षेत्राने सुयोग्य कृती योजना राबवल्या पाहिजेत असे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी केले. व्यावसायिक कोळसा खनन वाढवण्यासाठी केंद्रीय कोळसा मंत्रालयाने हाती घेतलेल्या नव्या उपक्रमांचे तसेच सुधारणांचे त्यांनी कौतुक केले. व्यावसायिक लिलाव प्रक्रियेत 87 कोळसा खाणींचा लिलाव यशस्वीपणे पूर्ण झाला असून, त्यापैकी काही खाणींमध्ये कोळसा उत्पादनाला सुरुवात देखील झाली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.