Home मराठी बातम्या अर्थकारण आणि आर्थिक घडामोडी गेल्या वर्षीच्या तुलनेत जीएसटीत 12 टक्के वाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत जीएसटीत 12 टक्के वाढ

नवी दिल्ली, 01 मे (हिं.स.) : देशात गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या वस्तू व सेवा कराच्या संकलनात (जीएसटी) यावर्षी 12 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल 2022 मध्ये जीएसटी संकलन 1,67,540 कोटी रुपये होते. तर यावर्षी एप्रिल महिन्यात 19,495 कोटी रुपये अधिक जीएसटी जमा झाला आहे.

जीएसटी संकलनाचा डेटा जारी करताना, अर्थ मंत्रालयाने सांगितले की एप्रिल 2023 मध्ये जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत 12 टक्के जास्त आहे. 20 एप्रिल 2023 रोजी एका दिवसात 9.8 लाख व्यवहार झाले, ज्यामध्ये एका दिवसात 68,228 कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये एकूण 1,87,035 कोटींच्या जीएसटी संकलनात सीजीएसटी संकलन 38,440 कोटी रुपये, एसजीएसटी संकलन 47,412 कोटी रुपये, आयजीएसटी 89,158 कोटी रुपये आणि उपकर म्हणून 12.025 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. एप्रिल 2023 मध्ये झालेल्या व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सर्वाधिक जीएसटी संकलनाची नोंद होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्याप्रमाणे अपेक्षेनुसार एप्रिल महिन्यातील जीएसटी संकलनाने आजवरचे जीएसटी करवसुलीचे सर्व विक्रम मोडत, नवा उच्चांक गाठला आहे.

देशात सर्वाधिक जीएसटी संकलन करुन देणाऱ्या राज्यात महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे. महाराष्ट्रातून एप्रिल 2023 मध्ये 33196 कोटी रुपयाचा जीएसटी संकलित झाला आहे. गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल 2022 मध्ये हा आकडा 27495 कोटी रुपये होता. महाराष्ट्राने गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये तब्बल 21 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. महाराष्ट्रानंतर जीएसटी संकलनात दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे. कर्नाटकने 14593 कोटी रुपये कर संकलित केला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर गुजरातने केलेलं जीएसटी संकलन आहे. गुजरातने एप्रिल महिन्यात 11721 कोटी रुपयाचा जीएसटी संकलित करुन दिला.

हिंदुस्थान समाचार. – tag in finance

Leave a Reply

Your email address will not be published.