Home मराठी बातम्या निधन चिपळूणच्या शिवसेना कार्यकर्त्याची आत्महत्या

चिपळूणच्या शिवसेना कार्यकर्त्याची आत्महत्या

रत्नागिरी, 14 मे, (हिं. स.) चिपळूण शहरातील मुरादपूर येथील गुलाब इमारतीमधील रहिवासी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवासेना उपविभागप्रमुख दाबिन मिर्जाहुसेन पिरजादे (वय १८) याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दाबिनच्या वडिलांचा मृत्यू करोनाच्या कालावधीत झाला होता. त्यानंतर आता त्याची आई मिरज येथे वैद्यकीय उपचार घेत आहे. त्यामुळे घरी कोणीही नव्हते. अशातच त्याने आत्महत्या केली. दाबिनचे कुटुंब मूळचे सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील आहे. वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असल्याने ते शहरात मुरादपूर भागात स्थायिक झाले.

डीबीजे महाविद्यालयात शिकत असतानाच दाबिन युवा सेनेत सक्रिय झाला. काही दिवसांपूर्वीच युवासेना तालुकाधिकारी उमेश खताते यांनी दाबिनमधील संघटनकौशल्य ओळखून त्याला मुरादपूर उपविभागप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली होती. आता त्याने आत्महत्या केली आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.